शंभर टक्के पुनर्वसनासाठी जांभावासीयांचे अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 07:16 PM2021-09-25T19:16:45+5:302021-09-25T19:16:57+5:30
Murtijapur News : २५ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी मारोतीच्या पारावर तीसरे अन्नत्याग आंदोलन केले.
मूर्तिजापूर : काटेपूर्णा नदीवरीर मंगरूळकांबे येथे झालेल्या बॅरेज मुळे बाधित झालेल्या जांभा गावचा पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. विविध आंदोलने करुन हे गावकरी आपली मागणी पुढे रेटत असताना २५ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी मारोतीच्या पारावर तीसरे अन्नत्याग आंदोलन केले.
तालुक्यातील मंगरूळ कांबे बॅरेजची कामे मात्र रखडलेली आहेत. मंजूर झालेल्या बॅरेजेस मुळे बाधित झालेले गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश असून या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला असल्याने गावाचे १०० टक्के पुनर्वसन करावे अशी मागणी आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत विविध आंदोलनास आत्मदहनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला. गाव १०० टक्के बाधित असल्याने तसा अहवाल कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग यांच्या वतीने २ डिसेंबर २०१० रोजी सदर केला व गाव शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यातच पुनर्वसन कलम (११) जाहीर झालेले असल्याने जांभाा बुद्रुक गावांमध्ये विकासाची कामे करणेबाबत पूर्ण मनाई करण्यात आलेली आहे. शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही पुनर्वसनासाठी टाळाटाळ करण्यात येऊन गावकऱ्यांना झुलवत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर २०१६ मध्ये सदर गाव अंंशःता बाधित असल्याबाबतचा जावई शोध लावण्यात आला. परंतु शासन जोपर्यंत जाभां बु. गावाचे १०० टक्के पुनर्वसन करीत नाही तोपर्यंत विविध आंदोलने छेडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारी जाभा येथील हनुमानाच्या पारावर एक दिवसाचे लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले.
प्रकल्पामुळे गावातील घरे मोडकळीस आलेली असून ती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.गेल्या ११ वर्षापासून गावकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात येत असल्याने आता गावकरी सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. सद्यस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी गाव १३ टक्के बाधित क्षेत्रात येत आहे असे सांगून ३५० घरांपैकी ७० घरांंची पुनर्वसन यादी तयार केली आहे.
या अन्नत्याग आंदोलनात यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी झाले होते.