जनता कर्फ्यू : वाशिम येथील बाजारपेठ कडकडीत बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 04:08 PM2020-09-16T16:08:17+5:302020-09-16T16:08:31+5:30
पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाश्मि : वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी मंडळाने शहरात १६ सप्टेंबरपासून सात दिवशीय ‘जनता कफ्यू’ची हाक दिली. पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. ‘जनता कर्फ्यूू’ला व्यापाऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, रस्त्यावर वाहनधारक, पादचाऱ्यांची वर्दळही दिसून आली. पुढील सहा दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला असून, मृत्यूच्या संख्येने अर्धशतक ओलांडले. जिल्ह्यात सध्या ३०४१ रुग्णसंख्या असून, यापैकी ८५८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. वाशिम शहरात ९०० पेक्षा अधिक एकूण रुग्णसंख्या असतानाही, बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पृष्ठभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान वाशिम शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय व्यापाºयांनी १३ सप्टेंबरच्या बैठकीत जाहिर केला होता. त्यानुसार १६ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू पाळला जात असून, पहिल्याच दिवशी दवाखाने, मेडीकल, दूध संकलन व विक्री वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.
सहकार्य करण्याचे आवाहन
वाशिम शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. शहरातील बाजारपेठेत गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सात दिवस बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. जनता कर्फ्यूदरम्यान नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नेहमी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन व्यापारी मंडळाने केले.