रद्द झालेल्या जात प्रमाणपत्रावर नोकरी मिळविली
By admin | Published: June 27, 2014 01:18 AM2014-06-27T01:18:01+5:302014-06-27T01:33:06+5:30
पातूर पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांची ‘सीईओं’कडे तक्रार.
अकोला- जातीचे प्रमाणपत्र जातवैधता समितीने रद्द केल्यानंतरही पातूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी विनोद शिंदे यांनी शासनाची दिशाभूल करून नोकरी बळकावल्याचा आरोप करीत माजी कृषी सभापती नितीन देशमुख यांनी त्यांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे गुरुवारी केली.
जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे विनोद शिंदे यांची कृषी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. २00७ मध्ये त्यांना तात्पुरत्या स्वरूपात सेवेत घेण्यात आले. त्यांचे ठाकूर जातीचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले होते. त्याला शिंदे यांनी न्यायालयात आव्हान दिले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर त्यांना तीन महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीवर तत्कालीन सीईओंनी नियुक्ती दिली होती. २00७ मध्ये नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.
असे असतानाही त्यांना अद्याप सेवेत कायम ठेवण्यात आले आहे. त्यांची नियुक्ती बेकायदेशीर असून, त्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नितीन देशमुख यांनी सीईओ यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी कृषी विकास अधिकार्यांकडेही तक्रार केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश कृषी विकास अधिकार्यांना दिले आहेत.