राज्यात प्रथमच होणार पाच रोगांचे संयुक्त सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:23 PM2019-08-27T18:23:29+5:302019-08-27T18:23:34+5:30
१३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत एकूण पाच रोगांबाबत घरोघरी रोग प्रतिबंध जागरुकता निर्माण केली जाणार आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: राज्यात प्रथमच कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य रोगाबाबात संयुक्त सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत एकूण पाच रोगांबाबत घरोघरी रोग प्रतिबंध जागरुकता निर्माण केली जाणार आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभागाच्या हालचाली सध्या सुरू आहेत.
राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये २०२५ पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणाºया अकाली मृत्यूंच्या संख्येमध्ये एकचतुर्थांश इतकी घट करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून कर्करोग, महुमेह, ह्रदयविकार यासारख्या असंसर्गजन्य रोगांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये या रोगांचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा आरोग्य विभागाकडूनही वारंवार उपाययोजना व विविध प्रकारच्या मोहीम हाती घेण्यात येत आहेत. मात्र राज्यात आता पहिल्यांदाच कर्करोग, महुमेह, ह्रदयविकार यासारख्या असंसर्गजन्य रोगांसोबत कुष्ठरोग, क्षयरोग याबाबतही सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. १३ ते २८ सप्टेंबर २०१९ या १५ दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरूग्ण शोध अभियान, सक्रिय क्षरूग्ण शोध मोहीम व उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग या असंसर्गजन्य जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा पातळीवर सर्व संबंधित आरोग्य यंत्रणांकडून मोहिमेची पुर्वतयारी करून घेण्यात येत आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील मोहिमेच्या पूर्वतयारीचे हे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. विविध रोगांची व संयुक्तरित्या राबविण्यात येणारी ही मोहीम घरोघरी पोहचविण्याच्या सुचना आरोग्य विभागाच्या असल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाºयांपासून कर्मचारी चांगलेच कामाला लागलेले आहेत.
असे होणार असंसर्गजन्य आजाराच्या धोक्याचे मुल्यांकन
एकूण पाच प्रश्नांद्वारे असंसर्गजन्य आजारांच्या धोक्याचे मुल्यांकन करण्यात येणार आहे. त्यामध्ये आपले वय किती?, आपण दररोज दारू पिता का?, आपण एका आठवड्यात किमान १५० मिनिटे शारीरिक व्यायाम करता काय?, आपण बिडी, सिगरेट, तंबाखूयुक्त गुटखा आदीचे सेवन करता का?, कमरेचे माप, आपल्या परिवारातील कोणी सदस्य उच्च रक्तदाब मधुमेह आणि ह्रदयरोग आजारांनी पीडित आहे का? या प्रश्नावलीचा समावेश आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला चारपेक्षा जास्त गूण असतील तर त्या व्यक्तीला असंसार्गिक आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांना नजीकच्या उपकेंद्रात तात्काळ जाऊन तपासणी करण्याचा सल्ला दिला जाणार आहे.
आतापर्यंत प्रत्येक रोगाची मोहीम वेगवेगळी राबविल्या जात होती. परंतू आता प्रथमच कुष्ठरूग्ण शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्य जागरूकता एकत्रित रित्या केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ही मोहीम संयुक्त असल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी कमी लागतील व त्यांचा वेळही वाचणार आहे.
-डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.