- संजय खांडेकरअकोला: अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानासोबत आता प्राथमिक शाळांचा प्रवासही काळानुरूप बदलणार असून, त्याला कुणी थांबवू शकणार नाही. काळानुरूप आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी भविष्यात सज्ज व्हावे लागणार आहे, असे मत मूल्यमापन, गुणांकन, स्वयंमूल्यमापन पद्धतीमध्ये राज्याचे शाळासिद्धी प्रशिक्षक आणि अकोला जिल्हा समन्वयक प्रशांत शेवतकर यांनी व्यक्त केले.प्रश्न: अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत कसा असेल शाळांचा प्रवास?उत्तर: अध्यापनाच्या विविध अंगांचा विचार केला, तर मुख्यत्वे ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण आणि डिजिटल वर्गाध्यापन या काही नवीन संकल्पना मागील काही वर्षांमध्ये प्रकर्षाने शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. नवनवीन साहित्याची शिक्षकांद्वारे निर्मिती तसेच विविध घटकांचे व्हिडिओ, ब्लॉग, वेबसाइट यांचे वर्चस्व शिक्षण क्षेत्रामध्ये प्रस्थापित झाले आहे. ही आधुनिक शिक्षणाची नांदी आहे.
प्रश्न: आधुनिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होणार आहे का?उत्तर: पुढील काही वर्षांमध्ये शिक्षणाचा संपूर्ण ढाचा अत्याधुनिक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. भविष्यात कागदविरहित शिक्षण येण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक डेस्कवरच टचस्क्रीन असेल, त्यावर संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश केलेला असेल. सोबतच लिखाणासाठी विशिष्ट पद्धतीचा पेन दिला जाईल. डिजिटल साधनांच्या वापरातून शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती घडेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होईलच.
प्रश्न: पेपरलेस शिक्षण पद्धती कशी असेल?उत्तर: मागील काही वर्षांत पेपरलेस बाबींचा शिक्षण क्षेत्रामध्ये अंतर्भाव झालेला आहे. अनेक शालेय बाबी आता आॅनलाइन झालेल्या आहेत. या क्रांतीनंतर निश्चितच वर्गाध्यापन हेसुद्धा आॅनलाइन होईल. ज्या शिक्षकांमध्ये ज्या क्षमता आहेत, त्या क्षमता पुरेपूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला मदत होणार आहे. विषय तज्ज्ञांना अधिक महत्त्व येईल. भाषा प्रभुत्व, गायन आणि कौशल्याची किंमत होईल. ते वैश्विक संधी मिळेल. आॅनलाइन धडे गिरविताना भविष्यात पेपरलेस शिक्षण पद्धती जन्माला येईल.
प्रश्न: आधुनिक शिक्षण पद्धती विद्यार्थी घडविण्यात सक्षम असेल काय?उत्तर: वैज्ञानिक क्रांतीच्या माध्यमातून शिक्षकांना ज्ञानदान करणे निश्चितपणे सोपे होणार आहे. खेळ क्षेत्रांमध्ये प्रावीण्य असणारी मंडळी त्या क्षेत्रात मार्गदर्शक ठरणार आहे, तसेच कला क्षेत्रांमध्ये नैपुण्य प्राप्त मंडळीच्या ज्ञानाचा उपयोग एकाच वेळी खूप शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार आहे. कार्यालयीन कामकाजामध्ये प्रभुत्व असणाऱ्या मंडळींचा उपयोग अतिशय प्रभावीपणे इतर शाळांपर्यंत पोहोचायला मदत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अतिशय सुलभ होणारी ही क्रांती असेल. त्यातून सक्षम पिढी निश्चित घडेल.