- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: उन्हाळा आणि पोहणे हे समीकरण जुळते; मात्र हिवाळा आणि पोहणे, हे समीकरण काही पटत नाही; परंतु ऐन हिवाळ्यात किमान तापमान घटलेले असतानादेखील पहाटे तरण तलावात पोहण्याचा आनंद घेताना हौशी जलतरणपटू दिसत आहेत. संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे किमान तापमानातही पहाटेच्या बॅचमध्येदेखील ३० ते ४० हौशी जलतरणपटू नियमित पोहायला येतात.हिवाळा हा पोहण्याचा सीझन नाही, असा समज पसरलेला आहे. त्यामुळे हिवाळ्यात तरण तलावावरची गर्दी ओसरलेली दिसते. मग फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणात उष्णता जाणवू लागल्यानंतर तरण तलावाकडे लोक वळतात. उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात तर लोक तरण तलावावर प्रचंड गर्दी करतात. सर्वच्या सर्व बॅचेस हाउसफुल्लच नव्हे, तर ओव्हरफ्लो होत असतात. हिवाळा हा उत्तम आरोग्य संपदा मिळविण्याचा काळ आहे. पोहण्याने सर्वांगाला व्यायाम होत असल्याने आरोग्यास सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे हिवाळ्यात पोहण्याने शरीरावर कुठलाही दुष्पपरिणाम होत नाही, असे क्रीडा तज्ज्ञांचे मत आहे.सद्यस्थितीत अकोला शहर गारठले आहे. शनिवार, ११ जानेवारी रोजी तापमान ९.९ डिग्री सेल्सिअस होते. शुक्रवारी १०.७ होते. डिसेंबर महिन्यात २६ तारखेला तर ६.०५ डिग्री होते. २९ तारखेला ६.६ होते. आणि ३१ डिसेंबरला १२.६ डिग्री सेल्सिअस असे वातावरण घटले होते. अशा स्थितीतही हौशी जलतरणपटूंनी पोहणे सोडले नाही. सकाळच्या सुमारे ६.३० वाजताच्या बॅचमध्ये जवळपास तीस ते चाळीस हौशी जलतरणपटू पोहण्यासाठी येतात. यामध्ये बहुतांशी श्रीराम ग्रुपचे सदस्य आहेत. सूर्य माथ्यावर येऊनही एकीकडे थंडीत पांघरू णात झोपणारे तर एकीकडे हे स्वीमर्स थंडीची पर्वा न करता नियमित पोहताना दिसतात.पोहण्याचे फायदे
- पोहणे हा एक असा व्यायाम आहे, ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागामधील कॅलरी खर्च होते.
- पोहणे मान, खांदा, हात आणि पायांची लवचिकतादेखील प्रदान करते.
- जलतरण अत्याधिक थकविणारा खेळ नाही. हा असा खेळ आहे, जो प्रत्येकजण सहज करू शकतो.
- पोहणे उच्च रक्तदाब कमी करते.
- पोहणे व्यक्तीस निरोगी आणि आदर्श वजन नियंत्रण देते.
- जलतरण तणाव कमी करते.
- मज्जातंतूंना विश्रांती आणि आराम प्रदान करते.
- पोहताना दुखापत होण्याचा धोका कमी असतो.
- हाडांची घनता सुधारते.
- पाठदुखी कमी करते.