जूनमध्ये रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचा आकडाही घसरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:31+5:302021-07-05T04:13:31+5:30
अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घातलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र जून महिन्यात पहायला मिळाले, असले तरी संकट ...
अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घातलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र जून महिन्यात पहायला मिळाले, असले तरी संकट अद्याप संपले नाही अशी स्थिती आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १९१८ रुग्ण आढळले आहेत, तर ५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर फोफावला होता. एकाच महिन्यात तब्बल १५ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने मे महिना आतापर्यंतच्या कोविड संकटात सर्वात घातक ठरला होता. याशिवाय गेल्या महिनाभरात तब्बल ३७६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, जून महिन्यात दुसरी लाट ओसरताना दिसली. महिनाभरात १९१८ रुग्ण आढळले. तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पसरण्यास सुरुवात झाली. फेब्रुवारीतच साडेचार हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. पुढे मे महिन्यापर्यंत वाढत गेलेला कोविडचा आलेख रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी नव्या व्हेरिएंटचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना नियमांचे पालन करावे व सुरक्षात्मक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
---
असा वाढला रुग्णसंख्येचा आलेख
महिना- रुग्ण - मृत्यू
जानेवारी - ११३५ - १४
फेब्रुवारी - ४५२७ - ३१
मार्च - ११५५५ - ८६
एप्रिल - १२४६० - २३६
मे - १५३६१ - ३७६
जून - १९१८ - ५८