अकोला : रोबोटिक्स तंत्रज्ञानातअकोला शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणाऱ्या रोबोटिक्स तज्ज्ञ काजल राजवैद्य या शासनाच्या स्टार्टअप यात्रा महास्पर्धेत उत्कृष्ट महिला उद्योजिका म्हणून अव्वल ठरल्यात. मुंबई येथे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते एक लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजिकता व नावीन्यता विभागाच्या वतीने राज्यस्तरीय स्टार्टअप यात्रा महास्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या महास्पर्धेत राज्यभरातील अनेक नावीन्यपूर्ण तज्ज्ञ व नव उद्योजिकांनी सहभाग घेतला. यात काजल राजवैद्य यांचा २५०० स्पर्धकांमधून ‘इलेक्ट्रिक वेकल सेल्फ लार्निंग कीट, ट्रेनिंग व सेवा’ हा नावीन्यपूर्ण आविष्कार सर्वोत्कृष्ट ठरला. यासाठी राजवैद्य यांना सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका घोषित करीत त्यांना एक लाख रुपये रोख व पुरस्कार बहाल करण्यात आला.
यावेळी राजवैद्य यांच्यासमवेत इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञ विजय भट्टड उपस्थित होते. काजल राजवैद्य यांना यापूर्वीही जर्मनीने रोबोटिक्स ट्रेनर इन रोबोटिक्स टेक्नॉलॉजी अॅण्ड ऑपरेशन हे प्रमाणपत्र बहाल करून त्यांचा गौरव केला आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत पाठविले आहे.