कनकपुरा ते रोयापूरम पार्सल गाडीला अकोल्यात थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:36 AM2020-08-04T10:36:13+5:302020-08-04T10:38:01+5:30
आठवड्यातून एकदा चालणारी ही गाडी डाउन व अप प्रवासादरम्यान दर शनिवार व बुधवारी अकोला रेल्वेस्थानकावर थांबणार आहे.
अकोला : कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान रेल्वेची प्रवासी सेवा बंद असली, तरी मालवाहतूक सेवा सुरू आहे. राजस्थान राज्यातील कनकपुरा ते कर्नाटक राज्यातील रोयापूरमदरम्यान ३१ जुलैपासून विशेष पार्सल गाडी सुरू करण्यात आली असून, आठवड्यातून एकदा चालणारी ही गाडी डाउन व अप प्रवासादरम्यान दर शनिवार व बुधवारी अकोलारेल्वेस्थानकावर थांबणार आहे.
लॉकडाऊनदरम्यान आवश्यक साधनसामग्रीचे वहन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पार्सल गाड्या चालवण्यात येत आहेत. याच अनुषंगाने कनकपुरा ते रोयापूरम ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक -००९७१ डाऊन कनकपुरा ते रोयापूरम ही गाडी दर शुक्रवारी कनकपुरा स्थानकावरून दुपारी १२.४० ला प्रस्थान करेल आणि सोमवारी रात्री १२.४० ला रोयापूरम पोहोचेल. या गाडीला विविध ठिकाणी थांबा देण्यात आला असून, शनिवारील दुपारी १३.३० ला ही गाडी भुसावळ स्थानकावर येईल. तेथून प्रस्थान केल्यानंतर दुपारी २.४५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. अकोल्याहून नांदेड मार्गे निजामाबाद, सिकंदराबाद, रायचूर, गुंटकल, धर्मावरम, बेंगळुरू असा प्रवास करत ही गाडी सोमवारी रात्री रोयापूरमला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक - ००९७२ अप रोयापूरम ते कनकपुरा ही गाडी ४ आॅगस्टपासून प्रत्येक मंगळवारी रोयापूरम येथून दुपारी ०२.३० ला प्रस्थान करेल आणि गुरुवारी सायंकाळी ०५.१० ला कनकपुरा पोहोचेल.
परतीच्या प्रवासातही ही गाडी दर बुधवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी अकोला स्थानकावर येणार आहे. येथून भुसावळ, नंदुरबार, उधना, भरूच, वडोदरा, रतलाम, चित्तौडगढ, भिलवाडा, अजमेर असा प्रवास करत ही गाडी कनकपुराला पोहोचणार आहे. ज्या लोकांना किंवा व्यावसायिकांनाकाही साधनसामग्री पाठवयाची असेल त्यांनी आपल्या जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.