अकोला, दि. १७- चलनातून बंद करण्यात आलेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या बदल्यात शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल देण्याचे आमिष दाखविणार्या चार आरोपींना घेऊन खदान पोलिसांची चमू तपासासाठी नाशिकला रवाना झाली आहे. या ठिकाणी पोलीस आणखी काही लोकांची चौकशी करणार आहेत, तसेच तक्रारकर्त्याकडून आरोपींनी घेतलेले ५0 हजार रुपयेसुद्धा पोलीस वसूल करणार असल्याची माहिती आहे. रणपिसे नगरात राहणारे दादाराव वारके यांना १५ नोव्हेंबर रोजी धुळे येथील रहिवासी ज्ञानेश्वर पाटील, खामगाव येथील अनिल हिरोळे आणि बाळापूर येथील देवा हिवराळे आणि रवी नाईक यांनी चलनातून बंद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपये असलेल्या ५0 हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात १00 रुपयांच्या नोटांचे १0 बंडल देण्याचे आमिष दाखविले. दादाराव वारके आरोपींच्या आमिषाला बळी पडले आणि त्यांनी आरोपींच्या सांगण्यानुसार ५0 हजार रुपयांच्या नोटा कारागृहासमोरील एका दुकानावर आणून दिल्या. त्यानंतर आरोपींनी त्यांना रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक-१ वर बोलावून त्यांच्या हातात १00 रुपयांच्या बंडलामध्ये ३३ नोटा आणि उर्वरित नोटांच्या आकाराचे कागद दिले; परंतु स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींना अटक केली. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास खदान पोलिसांकडे देण्यात आला. नोटा बदलून देण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे हे नाशिक येथून असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. त्यामुळे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात खदान पोलीस आरोपींना घेऊन नाशिकला रवाना झाले आहेत. या ठिकाणी पोलीस नाशिक येथील काही लोकांची चौकशी करणार आहेत. तसेच आरोपींनी तक्रारकर्ते दादाराव वारके यांच्याकडून घेतलेले ५0 हजार रुपयेसुद्धा पोलीस जप्त करणार आहेत.
चौघा आरोपींना घेऊन खदान पोलीस नाशिकला रवाना!
By admin | Published: November 18, 2016 2:14 AM