- सचिन राऊत
अकोला: राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळेमुळे असलेल्या अकोल्यातील किडनी तस्करी रॅकेट प्रकरणाचा तपास गत दोन वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सुरू असला तरी तांत्रिक मुद्यांमुळे या किचकट प्रकरणाचा तपास थंडावल्याची खात्रीलायक माहिती आहे. या तपासाच्या गतीसाठी सीआयडी आणि राज्याचा आरोग्य विभाग यांच्यात पत्रव्यवहार सुरू असून, तांत्रिक मुद्दे स्पष्ट झाल्यानंतरच अकोल्यातील किडनी तस्करी रॅकेट प्रकरणाचा पुढील तपास सुरू होणार आहे.हरिहरपेठेतील राहुल नगरातील रहिवासी शांताबाई रामदास खरात आणि संतोष गवळी यांना देवेंद्र शिरसाट याने व्याजाने पैसे देऊन त्या पैशाची परतफेड होणार नाही, एवढी रक्कम त्यांच्यावर काढली होती. पैसे परत करा अन्यथा तुमची एक किडनी द्या. त्या मोबदल्यात ५ लाख रुपये देऊ, असे आमिष त्याने या दोघांना दिले. या आमिषाला बळी पडल्यानंतर शांताबाईची भेट बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मांडवा येथील विनोद पवार याच्याशी करून दिली होती. त्यानंतर औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नांदुरा येथील झांबड यास किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. तर संतोष गवळी व आणखी काहींना श्रीलंकेतील कोलंबो येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्या किडनी काढण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा पर्दाफाश लोकमतने १ डिसेंबर २०१५ रोजी केला होता. त्यानंतर २ डिसेंबर २०१५ रोजी पोलीस तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एक गुन्हा डाबकी रोड पोलीस ठाणे, तर दुसरा जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एक तपास स्थानिक गुन्हे शाखा, तर दुसरा तपास खदान पोलिसांनी केला होता; मात्र १८ आॅक्टोबर २०१६ रोजी हे तपास सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. सीआयडीकडून तपास सुरू करण्यात आला असून, त्यांनी आरोग्य खात्याकडून माहिती मागविली आहे; मात्र आरोग्य विभागाच्या ज्या १६ सदस्यीय सामितीकडून तांत्रिक मुद्दे स्पष्ट करणारा अहवाल सीआयडीला हवा आहे, तो आला नसल्याने या प्रकरणाचा तपास सध्या तरी थंड बस्त्यात आहे. या समितीच्या अहवालानंतर सीआयडीच्या तपासाला गती येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.