कोविड सेंटर बंद, रुग्णांचा घरीच मुक्काम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:46+5:302021-02-06T04:32:46+5:30
आयसोलेशन काळातही रुग्ण इतरांमध्ये मिसळतात वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी किमान १५ दिवस इतरांच्या संपर्कात ...
आयसोलेशन काळातही रुग्ण इतरांमध्ये मिसळतात
वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी किमान १५ दिवस इतरांच्या संपर्कात येणे टाळणे आवश्यक आहे. मात्र, अनेक रुग्णांकडून या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे हा प्रकार कोविडच्या फैलावासाठी कारणीभूत ठरत आहे.
पॉझिटिव्ह येऊनही रुग्णांसोबत संपर्क नाही
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण स्वत: होम आयसोलेशन किंवा रुग्णालयात दाखल होतो, तर अनेक रुग्णांना त्याचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हेच माहीत नसते. त्यामुळे अहवाल येताच महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे संबंधित रुग्णाशी संपर्क साधणे आवश्यक आहे, परंतु रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर चार ते पाच दिवसांनंतर त्याच्याशी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा संपर्क होतो. दरम्यानच्या काळात संबंधित रुग्ण नकळत इतरांच्याही संपर्कात येत असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे.
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला लक्षणे नसतील, तर होम आयसाेलेशनमध्ये ठेवण्यात येते. अशा रुग्णांनी नियमित मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात न येणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांवर कारवाईदेखील होऊ शकते. रुग्णांनी नियमांचे पालन करावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला