अकोला : कोविड लसीकरण माेहिमेला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी ३०० जणांना कोविड लस दिली जाणार आहे. त्यासाठी शहरात तीन केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. कोविड लसीकरणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा परिषद सीईओ सौरभ कटारिया, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, जीएमसी वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्यामकुमार शिरसाम, डॉ.मनिष शर्मा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड लसीकरण माेहिमेची सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. कोविन ॲपच्या माध्यमातून नोंदणी झालेल्यांपैकी ३०० जणांना शुक्रवारी लसीकरणासंदर्भात संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ त्यांनाच शनिवारी कोविडची लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर लाभार्थ्यांवर ३० मिनिटे वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्या येणार आहे. त्यानंतर, त्यांना २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. दरम्यानच्या काळात लाभार्थ्यांनी इतरांपासून सुरक्षीत अंतर, मास्कचा वापर आणि नियमीत स्वच्छ हात धुणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
लसीकरणासाठी तीन केंद्र
- जिल्हा स्त्री रुग्णालय
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय
- ऑर्बिट रुग्णालय (मनपाअंतर्गत)
असे होणार लसीकरण
सर्वप्रथम लाभार्थ्यांची पडताळणी होईल.
त्यानंतर, कोविन ॲपद्वारे पडताळणी करण्यात येईल.
पडताळणीनंतर लाभार्थ्याला लस दिली जाईल.
लसीकरणानंतर लाभार्थी ३० मिनिटांसाठी वैद्यकीय निरीक्षणात.
यांना लसीकरण नाही
१८ वर्षांखालील बालकं
गर्भवती व स्तनदा माता
दर आठवड्याला ४ सत्रांमध्ये लसीकरण
मोहिमेंतर्गत दर आठवड्याला ४ सत्रांमध्ये लसीकरण करण्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोहिमेंतर्गत एकूण १५ सत्र होणार असून, या माध्यमातून ४,५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.
हेल्पलाइन क्रमांक - ०७२४२४३७३७०