शौचालयाचे टाके उपसताना मजुराचा गुदमरून मृत्यू: दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:08 AM2020-06-09T10:08:39+5:302020-06-09T10:09:19+5:30
चतारी येथे शौचालयाचे टाके उपसताना गुदमरल्याने खेट्री येथील २८ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला तर दोन मजूर जखमी झाले.
खेट्री : चतारी येथे शौचालयाचे टाके उपसताना गुदमरल्याने खेट्री येथील २८ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला तर दोन मजूर जखमी झाले. ही घटना ८ जून रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मो. आरीफ अब्दुल कलाम असे मृतकाचे नाव आहे.
मो. आरीफ व शेख हकीम हे दोघे जण दोन दिवसांपासून चतारी येथे ज्ञानदेव मोतीराम डियुरे यांच्या घरी १२ ते १५ फूट असलेले जुने शौचालय उपसण्याचे काम करीत होते. सोमवारीसुद्धा हे शौचालय उपसण्याचे काम सुरू असताना शेख हकीम यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना वाचविण्यासाठी मो. आरिफ हे खाली उतरले; परंतु ते गुदमरून गंभीर झाले. गंभीर झालेल्या दोघांना वाचविण्यासाठी गणेश ज्ञानदेव डियुरे यांनी प्रयत्न केला; परंतु गणेश डियुरे हेसुद्धा गंभीर झाले. त्यांच्या नातेवाइकांनी तिघांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे दाखल केले; परंतु मो. आरिफ यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच दोघे जण गंभीर असून, त्यांच्यावर सध्या सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे उपचार सुरू आहे. मृतक मो. आरीफ यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून त्यांच्यावर खेट्री येथे सायंकाळी ८ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. मृतकाच्या पश्चात लहान दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, भाऊ-बहीण असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत चान्नी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.