- राजरत्न सिरसाट अकोला: रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी कंत्राटदाराने आणलेले तेलंगणा राज्यातील ३० ते ३२ मजूर रोजी रोजगार संपल्याने बुधवारी रात्री उगवा या गावाकडून तेलंगणाकडे पायीच निघाले होते. रेल्वे मार्गाने रात्रभर १२ किलोमीटरचा प्रवास करून हे सर्व मजूर चालत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या शिवनेरी वसतिगृह येथे पहाटे पोहोचले. सकाळी ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आल्यावर या मजुरांना आता अकोल्यातच निवारा देण्यात आला आहे.
अकोला ते अकोट रेल्वे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी कंत्राटदाराने वारंगल जिल्ह्यातील एका खेड्यात राहणाºया ३० ते ३२ मजुरांना कामासाठी आणले होते; परंतु कोरोनाचा जगभर वाढता प्रसार आणि भारतातही हा विषाणू पसरत असल्याने त्याला रोखण्यासाठी २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. २१ दिवसांची ही टाळेबंदी १४ एप्रिल रोजी संपणार होती; परंतु या विषाणूचा प्रसार वाढतच असल्याने पुन्हा ३ मेपर्यंत टाळेबंदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एकतर कंत्राटदार सोडून गेला आणि मजुरांकडे जो काही पैसा होता तोही संपला. काही दिवस त्यांनी शेतकºयांनी सोडून दिलेल्या शेतातील फरदड कापूस विकून अर्धपोटी कसे तरी दिवस काढण्याचा प्रयत्न केला. आता उपजीविकेचे कोणतेच साधन नाही आणि उपासमार सहन होत नसल्याने अखेर या सर्व मजुरांनी गावाकडे जाण्याचा रस्ता धरला. यात दोन वर्षातील मुलांसह एक सहा महिन्यांची गर्भवती महिला हिचाही समावेश होता. रात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास हे मजूर उगवा येथून निघाले. लहान मूल, गर्भवती महिला सोबत असल्याने त्यांना अकोल्याला येता येता पहाट उजळली. रेल्वे मार्ग डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यपीठाजवळून जात असल्याने विसाव्यासाठी ते येथील शिवनेरी विद्यार्थी वसतिगृहाच्या परिसरात थांबले. कृ षी विद्यापीठाच्या अधिकाºयांना ही माहिती प्राप्त होताच त्यांनी येथील नळ सुरू केले. शिवर येथील युवकांनी त्यांना खिचडी आणून दिली. हे सर्व तेलुगू भाषा बोलत असल्याने इतरांना कळत नाही. मिहान तोटावार यांना ही भाषा समजत असल्याने त्यांनी या मजुरातील प्रमुख याच्यासोबत बोलून त्यांची व्यथा जाणून घेतली. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.
गर्भवती महिलेला इंजेक्शनचे दोन डोस मिळाले नाहीत!यात एक गर्भवती महिला आहे. तिला या अवस्थेत देण्यात येणारे दोन महिन्यांचे इंजेक्शन मिळाले नाही. तिला दीड ते दोन वर्षांचे बाळ आहे.