मूर्तिजापूर : नगर परिषदेच्या दुकानात सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा पालकमंत्र्यांच्या दरबारात माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी मांडला. निवेदनात नमूद केले की, मूर्तीजापूर नगरपालिका दर महिन्याला तीन लाख रुपयांपर्यंत भाडे वसूल करते. नगरपरिषद भाडे वसूल करण्यात सक्षम आहे, पण दुकानदारांना सुविधा देण्यास असक्षम दिसत आहे. मूर्तीजापूर शहरात अनेक ठिकाणी दोन मजली संकुले बांधली आहेत. शिवाजी मार्केटमध्ये असलेले लघुशंकागृह जीर्ण झाले असून ते कधीही पडण्याची शक्यता आहे. कोकणवाडी रोडवर एक वर्षांपूर्वी नगरपालिकांनी चार हाॅलचे बांधकाम सुरू केले होते. त्या जागेवर लघुशंकागृह होते, परंतु ते पाडण्यात आले. मात्र, या ठिकाणी नवीन लघुशंकागृहाची व्यवस्था केली नाही. नगरपरिषदेकडे जागा असून व्यापाऱ्यांना नाहक त्रास देण्याचे काम केले जात आहे. याकडे दुर्लक्ष हाेत आहे. यासंदर्भात अनेकदा व्यापाऱ्यांनी निवेदनसुद्धा दिली आहेत. परंतु, निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी नगरपरिषद संकुलांमध्ये त्वरित शौचालय व लघुशंकागृहाची व्यवस्था करण्याची मागणी नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी केली. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आ. गोपीकिशन बाजोरिया, मुख्याधिकारी विजय लोहकरे, नगराध्यक्ष मोनाली गावंडे यांना देण्यात आल्या आहेत.
मूर्तीजापूर नगरपरिषदेच्या दुकानात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:16 AM