अकोला : डाबकी रोडवरील वानखडे नगर येथील रहिवासी एका युवकाने शुक्रवारी दुपारी बँकेतून एक लाख रुपयांची रोकड काढल्यानंतर आरोग्य नगर मधील व्यंकटेश एजन्सी देण्यासाठी जात असतानाच त्यांच्या दुचाकीवरील एक लाखाची रोकड अज्ञात चोरट्याने पळविलेची घटना घडली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वानखडे नगर येथील रहिवासी अजित गवारे यांनी एक लाख रुपये बँकेतून काढल्यानंतर खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरोग्य नगर येथे असलेल्या वेंकटेश एजन्सीमध्ये ती रक्कम जमा करण्यासाठी ते एम एच 30 ए एम 2140 क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. आरोग्य नगरमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी दुचाकीची डिकी उघडून बघितली असता त्यामध्ये एक लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याचे दिसून आले. ज्या पिशवीमध्ये ही रक्कम ठेवली होती ती पिशवी गायब झाल्याने त्यांना रक्कम चोरीला गेल्याचा अंदाज आला. त्यांच्यावर कोणीतरी पाळत ठेवून रक्कम लंपास केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.