अकोला : महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिव्यांसाठी शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे मनपा प्रशासनाने व नगरसेवकांनी तयार केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावात फेरबदल केला जात आहे. यापुढे एलईडीची कामे ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेली प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे. त्यामुळे या विषयावर १७ फेब्रुवारी रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.‘सीएफएल’ पथदिव्यांमुळे विजेची बचत होण्याचा दावा करीत महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात सीएफएलचे पथदिवे लावले. कालांतराने नागरिकांना सीएफएलच्या अंधुक उजेडाचा सामना करण्याची वेळ आली. यावर उपाय म्हणून लख्खं प्रकाश देणाºया एलईडीचा वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. एलईडीचा प्रकाश व विजेची बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने ‘ईईएसएल’ कंपनीची निवड केली. या कंपनीच्या माध्यमातून पथदिवे उभारण्याचे स्पष्ट निर्देश मनपा प्रशासनाला दिले. तत्पूर्वी सुवर्ण जयंती नगरोत्थान व दलितेतर निधीतून होणाºया नऊ कोटींच्या विकास कामांमध्ये प्रशासनासह नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात एलईडी पथदिव्यांच्या कामांचा समावेश केला. एलईडीसंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीचा मुद्दा समोर येताच प्रशासनासह नगरसेवकांची गोची झाली आहे. नऊ कोटींच्या विकास कामांच्या अद्यापही निविदा मंजूर न झाल्यामुळे एलईडीची कामे रद्द करणे प्रशासनाला बंधनकारक आहे. यामुळे प्रभागात एलईडी लावण्यासाठी इच्छुक असणाºया सर्वपक्षीय नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसत आहे.२० कोटींच्या कामाला अडथळा नाही!शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती करण्यापूर्वी मनपा प्रशासनाने २० कोटी रुपयांतून शहरातील प्रमुख रस्ते, प्रमुख चौकांमध्ये एलईडी पथदिवे उभारण्याचा कंत्राट दिला आहे. शासन निर्णयाचा २० कोटींच्या कामाला अडथळा नसून, यापुढे एलईडी लावण्यासाठी केवळ ईईएसएल कंपनीची मदत घ्यावी लागणार आहे.