पत्नीच्या डोक्यावर फावडे मारून हत्या करणाऱ्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 02:08 PM2020-03-08T14:08:20+5:302020-03-08T14:08:26+5:30
नारायण मोतीराम पवार याने १ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पत्नी लक्ष्मी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरासमोरच फावड्याने तिच्या डोक्यावर हल्ला चढविला होता.
अकोला: चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या इसमाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात फावडे मारून तिची हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवित शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच पाच हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे.
चान्नी येथे घरजावई म्हणून राहत असलेल्या दोषी नारायण मोतीराम पवार याने १ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पत्नी लक्ष्मी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरासमोरच फावड्याने तिच्या डोक्यावर हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मीला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केले होते. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या हत्याकांड प्रकरणाची सुनावणी चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांच्या न्यायालयात झाली. मृतक लक्ष्मी हिचे वडील जे तिच्या घराच्या बाजूलाच राहत असल्याने त्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली असल्याची साक्ष न्यायालयात दिली. तसेच डॉक्टर व अन्य साक्षीदारांच्या पुराव्याच्या आधारे लक्ष्मीचा पती नारायण पवार यास दोषी ठरविण्यात आले. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आल्यानंतर पवार यास न्यायालयाने दोषी ठरवित भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच पाच हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे.