लॉकडाउन : एक हजार रुपयांसाठी २० किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 10:50 AM2020-04-18T10:50:13+5:302020-04-18T10:52:49+5:30

एक हजार रुपये काढण्यासाठी तुलंगा बु. येथील माय-लेकींना २० किमीपर्यंत पायपीट करावी लागली.

Lockdown: 20km walk for one thousand rupees | लॉकडाउन : एक हजार रुपयांसाठी २० किमीची पायपीट

लॉकडाउन : एक हजार रुपयांसाठी २० किमीची पायपीट

googlenewsNext
ठळक मुद्दे १२ वर्षीय मुलीला घेऊन शुक्रवारी सकाळी वाडेगावला जाण्यासाठी निघाल्या बसस्थानकावर वाहन नसल्याने दोघींनी पायीच वाडेगाव गाठण्याचा निर्णय घेतला. भरउन्हात दीड ते दोन तासानंतर त्या वाडेगाव येथील बँकेत पोहोचल्या.

- राहुल सोनोने  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने ‘लॉकडाउन’ केले आहे. २० दिवसांनंतर पुन्हा ‘लॉकडाउन’ वाढविण्यात आल्याने मुलीच्या खात्यात जमा झालेले एक हजार रुपये काढण्यासाठी तुलंगा बु. येथील माय-लेकींना २० किमीपर्यंत पायपीट करावी लागली. भरउन्हात पोटात अन्नाचा कणही नसताना या माय-लेकींनी दीड तासानंतर वाडेगाव गाठले.
‘लॉकडाउन’ वाढविण्यात आल्याने ग्रामीण भागातील मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. चार दिवसांपासून मोफत मिळालेल्या तांदळावर दिवस काढत असलेल्या तुलंगा येथील आशाबाई वाघमारे यांच्या मुलीच्या खात्यात विद्यार्थिनी प्रोत्साहन भत्त्याचे एक हजार रुपये जमा झाले. घरात अन्नाचा दाणाही नसल्याने वाघमारे यांनी १२ वर्षीय मुलीला घेऊन शुक्रवारी सकाळी वाडेगावला जाण्यासाठी निघाल्या. तुलंगा बसस्थानकावर वाहन नसल्याने दोघींनी पायीच वाडेगाव गाठण्याचा निर्णय घेतला. भरउन्हात दीड ते दोन तासानंतर त्या वाडेगाव येथील बँकेत पोहोचल्या. तिथे एक तास ताटकळत रांगेत लागल्यानंतर मुलीच्या खात्यावर जमा झालेले एक हजार रुपये त्यांना मिळाले. या पैशातून त्यांनी तीन किलो गहू, काही समान घेऊन भरउन्हात परत तुलंगा गावाकडे पायी प्रवास सुरू केला. २० किलोमीटरचा प्रवास हा भरउन्हात करता करता त्या मुलीला तहान व भूक लागली. आई माझे पाय दुखत आहेत, अशी आर्त हाक मुलगी आईला देत होती तर आईसुद्धा चल आता लवकर जाऊ घरी, असा धीर देत आईने मुलीला ६ किलोमीटर दिग्रसपर्यंत आणले. ही बाब रस्त्याने जात असलेल्या प्रशीस विष्णू सदार या मुलाच्या निदर्शनास आली. त्याने महिला व तिच्या मुलीला जेवणाचा डब्बा दिला. या महिलेच्या घरी म्हातारी आई व एक लहान मुलगा आहे.

Web Title: Lockdown: 20km walk for one thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.