अकाेला : जिल्ह्यासह शहरात पुन्हा एकदा काेराेनाचा उद्रेक झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साेमवारी सुधारित आदेश जारी केले असून त्यामध्ये मेडिकल स्टाेअर्स सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवण्याचे नमूद करीत हाॅटेल, रेस्टाॅरन्टला सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा दिली आहे. यामुळे जिल्हा व मनपा प्रशासनाला रुग्णांपेक्षा खवय्यांची जास्त काळजी असल्याचे दिसून आले आहे.संसर्गजन्य काेराेना विषाणूने पश्चिम विदर्भात कहर माजविल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाचा नवीन ‘स्ट्रेन’असण्यावर वैद्यकीय क्षेत्रात मतेमतांतरे असली तरी काेराेनाची लागण झालेले रुग्ण माेठ्या संख्येने आढळून येत असल्याने प्रशासकीय यंत्रणांची झाेप उडाली आहे. यासंदर्भात ‘व्हीसी’द्वारे थेट मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश देताच दाेन्ही यंत्रणांची धावपळ सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केल्यानंतर २० फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून २१ फेब्रुवारी राेजी संपूर्ण दिवसभर ‘लाॅकडाऊन’ लागू केले. यादरम्यान, साेमवारी जिल्हा प्रशासन नेमका काेणता आदेश लागू करणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. सायंकाळी जिल्हा प्रशासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत सुधारित आदेश जारी केले. यामध्ये प्रामुख्याने मेडिकल स्टाेअर्स सुरु ठेवण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत निश्चित केली. दुसरीकडे शहरातील खवय्यांची पुरेपूर काळजी घेत हाॅटेल, रेस्टाॅरन्ट, खानावळीसाठी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली. जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सुविधेला बाजूला सारल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
केवळ दाेन मेडिकल स्टाेअर्सला परवानगी!
शहरातील केवळ दाेन मेडिकल स्टाेअर्सला २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी आहे. ही दाेन्ही औषधी दुकाने खासगी हाॅस्पिटलमध्ये असून याव्यतिरिक्त सर्व औषधी विक्रीची दुकाने बंद राहतील. अर्थात दुपारी तीननंतर एखाद्या आजारी व्यक्तीला औषधाची गरज भासल्यास त्यांना शहराच्या कानाकाेपऱ्यातून धावपळ करीत या ठिकाणी धाव घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मार्च २०२० मधील टाळेबंदीत सर्व औषधी दुकानांना रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली हाेती, हे विशेष.
मेडिकल स्टाेअर्सच्या मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांसाेबत चर्चा करून त्यातून सकारात्मक ताेडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
-डाॅ. पंकज जावळे, प्रभारी आयुक्त मनपा