अकोला: लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल चौथ्यांदा दंड थोपटून उभे असलेले विद्यमान खासदार तथा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अॅड. संजय धोत्रे यांची विजयाची शृंखला कायम ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सक्रिय झाल्याचे चित्र आहे. कागदोपत्री ‘मॅनेजमेंट’ करण्यापुरतेच नव्हे तर प्रत्यक्षात मतदारांशी संपर्क व गाठीभेटी घेण्यावर त्यांच्या अर्धांगिनी सुहासिनीताई, मुलगा अनुप आणि स्नुषा समीक्षा अनुप धोत्रे यांचा भर असल्याचे दिसून येत आहे.भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार अॅड. संजय धोत्रे यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकीपासून अॅड. धोत्रे यांची विजयाची शृंखला कायम आहे. उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षा उंचावलेल्या असतात. त्या अपेक्षांचे काही प्रमाणात का असेना, उमेदवारावर भावनिक दडपण राहतेच. साहजिकच अशावेळी निवडणुकीच्या कालावधीत जर संपूर्ण कुटुंबाने साथ दिली तर उमेदवाराचा उत्साह टिकून मानसिक आधार राहतो. या ठिकाणी हा उत्साह टिकवून ठेवण्यासोबतच प्रत्यक्षात प्रचार यंत्रणेत सहभागी होण्यासाठी विद्यमान खासदारांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये खेड्यापाड्यात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर कुटुंबातील सदस्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे.उमेदवार अॅड. संजय धोत्रेमागील २० वर्षांपासून राजकारणात सक्रिय सहभागी. १९९९ मध्ये मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात विजयी. २००४ पासून अकोला लोकसभा मतदारसंघात विजयाची शृंखला कायम. यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे असून, मृदुभाषी स्वभावासाठी प्रसिद्ध.सुहासिनीताई धोत्रेभारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या मार्गदर्शक पदावर कार्यरत. मागील चार महिन्यांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागात जाऊन महिला मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर. सकाळी ९ वाजता प्रचार सभा, कॉर्नर बैठकांसाठी रवाना झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत महिला मतदारांशी गाठीभेटी घेत आहेत.अनुप धोत्रेभारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणीत सक्रिय सदस्य म्हणून सहभागी आहेत. अत्यंत विनम्र अशी ओळख असणाऱ्या अनुप यांची प्रचाराची हटके स्टाइल आहे. मित्र परिवार व भाजयुमोतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रिसोडसह सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी संपर्क, त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन विचारपूस करण्यावर भर आहे.