अकोला: काँग्रेसच्या ‘चौकीदार चोर है’ या मोहिमेला छेद देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘मंै भी चौकीदार’ ही टॅग लाइन घेऊन २०१९ च्या निवडणुकीचा प्रचार सुरू केला. त्याच्या एक पाऊल पुढे जात आता महाआघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ‘लाज कशी वाटत नाही’, ही मोहीम सुरू केली आहे. आघाडीकडून राबविण्यात येणारी ही मोहीम केवळ सोशल मीडियावर नसून, प्रत्यक्षात रस्त्यावरदेखील सुरू करण्यात आली असून, शहरात लावण्यात आलेल्या या फलकांवर राष्ट्रवादीचा नामोल्लेखही नसल्याची बाब राष्टÑवादीतील अनेकांना खटकली आहे.सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन ‘लाज कशी वाटत नाही’, अशा आशयाचे फलक अकोला शहरात लावण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून पाच वर्षांत जनतेची केलेली फसवणूक, शेतकरी कर्जमाफीचे गाजर, उज्ज्वला योजनेचे अपयश, वाढलेली बेरोजगारी याचा जाब काँग्रेस ‘लाज कशी वाटत नाही’, या मोहिमेतून भाजप-शिवसेनेला विचारत आहे; मात्र या फलकांवर काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या राष्टÑवादीचा नमोल्लेखही नाही तसेच काँग्रेसच्या निशाणीव्यतिरिक्त कोणते चिन्हही नाही. हे जाहिरात फलक राज्य स्तरावरून नियोजित केले असल्याने स्थानिक नेत्यांनी आलेले फलक लावणे एवढेच काम केले आहे; मात्र केवळ महाआघाडी या शब्दाचाच उल्लेख केल्याची बाब राष्टÑवादीतील अनेकांना खटकली आहे.