अकोला: मतदारांच्या गाठीभेटी व प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून त्या-त्या भागातील पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी व नगरसेवकांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुषंगाने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये निवडक नागरिकांच्या घरी कॉर्नर बैठकांचे सत्र पार पडत असल्याची माहिती आहे. या बैठकांमध्ये मतदारांना मार्गदर्शन व मतदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते मतदान पदरात पाडून घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या १८ एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रचारासाठी वेळ कमी असल्यामुळे राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व नगरसेवकांनी शहरातील प्रत्येक प्रभागातील गल्लीबोळात बैठकांना प्रारंभ केला आहे. यामध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात बैठकांची धूम सुरू आहे. जुने शहरात सकाळी १० वाजतापर्यंत प्रभागातील निवडक नागरिकांच्या घरी बैठका आयोजित केल्या जात असल्याची माहिती आहे. या बैठकांना प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांची उपस्थिती लाभत आहे. शहरी भागातील विकासाचे मुद्दे आणि समस्यांवर चर्चा होण्यासोबतच देशपातळीवरील राजकीय विषयांना हात घातल्या जात असल्याची माहिती आहे.
Lok Sabha Election 2019 : अकोला पश्चिम मतदारसंघात कॉर्नर बैठकांचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 6:20 PM