Lok Sabha Election 2019 : सट्टा बाजार तेजीत; कमळाचे दर सर्वात कमी, तर पंजा-कपबशी मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 03:45 PM2019-04-19T15:45:17+5:302019-04-19T15:45:25+5:30
माहितीनुसार भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या कमळाच्या फुलाचे दर सर्वात कमी आहेत, तर पंजा आणि कपबशी त्यापाठोपाठ आहे.
- संजय खांडेकर
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तीन लढतींवर अकोल्यातील सट्टा बाजार तेजीत आहे. सट्टा बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या कमळाच्या फुलाचे दर सर्वात कमी आहेत, तर पंजा आणि कपबशी त्यापाठोपाठ आहे; मात्र नेहमीप्रमाणे यंदा सट्टा लावणाऱ्यांचे प्रमाणच घसरल्याची माहिती समोर आली आहे.
अकोल्यातील फुलाचे दर ८ ते १२ पैसे असून, त्यानंतर काँग्रेस उमेदवार हिदायत पटेलच्या पंजाचे दर ७ ते ८ रुपये आणि वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या कपबशीचे दर ९ ते १० रुपयांवर खायवाडी सुरू आहे. अकोला सट्टा बाजारात फुलावर एकतर्फी ‘खायवाडी’ सुरू असल्याने ते दर २५ पैशापासून कमालीचे खाली घसरत ८ पैशावर आले आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच सट्टा बाजारातील एकंदरीत चित्र भाजपकडे झुकलेले दिसत आहे, तर इतर दोन्ही उमेदवार थोड्याफार अंतराने विभागून मागे-पुढे राहणार असल्याचे चित्र सट्टा बाजारात आहे. बाजारात कोट्यवधींचा सट्टा लावणारे लोक हे संपूर्ण मतदारसंघाचा संभाव्य आढावा घेत बाजी लावत असतात. त्यामुळे त्यांचे अंदाज जवळ जवळ खरे ठरतात असे मानले जाते. मतमोजणी २३ मे रोजी असल्याने आता एक महिनाभर सट्टा बाजारातील उलाढाल सुरू राहणार आहे. सट्टा बाजारातील तज्ज्ञांनी वर्तविलेला अंदाज कितपत खरा ठरतो, हे निवडणूक निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
‘आयपीएल’च्या सामन्यावर सटोडियांचा भर
सट्टा राजकीय असो की क्रिकेटचा, खायवाडी करणारे सटोडिये आणि सटटा लावणारे लोक तेच असतात. आयपीएलचे क्रिकेट सामने आणि अकोला लोकसभा निवडणूक एकाच वेळी आल्याने दोन्ही सट्टा बाजार रंगलेला आहे; मात्र सटोडिये आयपीएलच्या सामन्यात जास्त गुंतलेले दिसत आहेत. राजकीय निवडणुकीपेक्षा जास्त लागवाडी आणि खायवाडी क्रिकेट सामन्यावर होत असल्याने सटोडिये लोकसभेपेक्षा क्रिकेटच्या सट्ट्याकडे वळले आहेत.
विजयाच्या ‘लीड’वर पैज
विजयी होणाºया उमेदवारास कितीचा लीड मिळेल, यावरही वेगळी पैज सट्टा बाजारात लागली आहे. ५० हजार, एक लाख आणि दोन लाख अशा तीन प्रकारच्या लीडवर खायवाडी झाली आहे. सट्टा बाजाराप्रमाणे अनेक ठिकाणी आपसात अशा पैज लागल्याचेही समजते. यामध्ये मोठी उलाढाल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.