अकोला: मुलांना विमानाचे भारी आकर्षण. विमानात बसून, आकाशाची छान सैर करायची हौस असते. ती हौस काही पूर्ण होत नाही; परंतु त्यांची ती स्वप्ने, त्यांची हौस पुरविण्याचे काम ‘लोकमत’ने केले. बालवयातच विमान सफर, संसद भवन, राष्ट्रपती भवन, ऐतिहासिक लाल किल्ला, केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी व मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. मोठे होऊन विमानात बसण्याचे स्वप्न बालवयातच केवळ ‘लोकमत’मुळे साकार झाले, अशी प्रतिक्रिया अकोल्यातील येथील हवाई सफर विजेती विद्यार्थिनी मृणाल प्रशांत सिरसाट (१४) हिने व्यक्त केली.‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत मृणाल सिरसाट हिने सहभाग घेतला आणि या स्पर्धेत ती जिल्ह्यातून विजेती ठरली. नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरसाठी तिची निवड झाली. २६ जून रोजी रात्री हवाई सफरवरून परत आलेल्या मृणालने ‘लोकमत’शी गुरुवारी दुपारी संवाद साधला आणि दिल्ली प्रवासाच्या अविस्मरणीय आठवणी कथन केल्या.संस्कारांचे मोती उपक्रमांतर्गत हवाई सफरसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत मृणाल सिरसाट २६ जून रोजी सकाळी ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचली. तेथील विमाने पाहून मृणाल अक्षरश: भारावून गेली. विमानात बसल्यावर दीड तासांत आम्ही सर्वजण दिल्लीला पोहोचलो. पहिल्यांदाच विमानात बसण्याची भीतीही वाटत होती आणि आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दिल्लीला गेल्यावर गोवा, महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. विमानतळावर बस घ्यायला आली. बसमध्ये बसूनच राजधानी दिल्लीची सैर केली. जे टीव्हीवर पाहायला मिळायचे, ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. सर्वकाही स्वप्नवत वाटत होते. मृणाल बोलत होती. दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास संसद भवनात पोहोचलो. या ठिकाणी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांनी स्वागत केले. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांनी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. एवढेच नाही, तर राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट, ऐतिहासिक लाल किल्लासुद्धा पाहायला मिळाला. हे सर्व पाहून आम्ही विद्यार्थी भारावून गेलो, अशा शब्दात मृणाल सिरसाट हिने तिचे प्रवास वर्णन सांगितले. रात्री १0 वाजता दिल्ली विमानतळावरून आम्ही नागपूरकडे हवाई उड्डाण केले. एकूणच संपूर्ण प्रवास आनंददायी आणि स्वप्नवत होता, असे मृणाल म्हणाली.
विमान, दिल्ली अनुभवण्याचे स्वप्न पूर्ण!मृणाल प्रशांत सिरसाट ही नोएल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकते. वडील प्रशांत सिरसाट हे निंबी मालोकार येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. आई मनीषा ही नोएल स्कूलमध्ये शिक्षिका आहे. आई मनीषा सिरसाट यांनी मृणालचे विमानात बसविण्याचे स्वप्न केवळ ‘लोकमत’मुळे पूर्ण होऊ शकले. यासोबतच लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धेमुळे तिला विमान प्रवास, दिल्लीतील ऐतिहासिक स्थळे अनुभवण्याची संधी मिळाली. राजकीय नेत्यांसोबत संवाद साधायला मिळाला. त्यामुळे ‘लोकमत’चे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.