पश्चिम विदर्भात अकोला जिल्ह्यामध्ये सर्वांत कमी पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 10:28 AM2021-07-11T10:28:52+5:302021-07-11T10:29:08+5:30
Lowest sowing in Akola district : पाच जिल्ह्यांत ७७.२ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
- सागर कुटे
अकोला : पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वांत कमी पेरण्या झाल्या आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ७७.२ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यामध्ये कपाशीची ८४.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.
यंदा विदर्भात मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दमदार पाऊस बरसणार व पिकेही चांगली येणार असल्याची प्रत्येकाला अपेक्षा होती; परंतु सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. जून महिना संपल्यानंतरही अपेक्षित पेरण्या झाल्या नव्हत्या. मात्र, गत चार दिवसांपासून विदर्भातील बहुतांश भागांत तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत आतापर्यंत ७७.२ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत; परंतु एकमेव अकोला जिल्ह्यात केवळ ५१ टक्के क्षेत्रात पेरणी झाली असून, बहुतांश पिकांच्या पेरणीची वेळ निघून गेली आहे. शेतात अपेक्षित ओल नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट पुढे राहिले आहे.
कडधान्य ७१.३, तर तेलबिया ७८.४ टक्के पेरणी
पश्चिम विदर्भात कडधान्य पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यासोबत तेलबिया पिकांसाठी काही जिल्हे महत्त्वपूर्ण आहेत. आतापर्यंत विभागात कडधान्याची ७१.३ टक्के, तर तेलबिया पिकांची ७८.४ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे.
अमरावती विभागातील पेरणी
सरासरी क्षेत्र
३२,२८,५८१ हेक्टर
पेरणी झालेले क्षेत्र
२४,९१,८८९ हेक्टर
वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पेरणी
अमरावती विभागातील चार जिल्ह्यांमध्ये पेरण्या ७० टक्क्यांच्या वर झाल्या आहेत; परंतु वाशिम व यवतमाळ जिल्ह्यामध्ये बहुतांश क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यामध्ये वाशिम ९०.१, तर यवतमाळ जिल्ह्यात ८८.६ टक्के, तर अमरावती जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रात पेरणी झाली.
७८ टक्के क्षेत्रावर सोयाबीन
यंदा सोयाबीन बियाणांसाठी शेतकऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे विकत घेत पेरणी केली. यामुळे सोयाबीनचे पेरणी क्षेत्र कमी होते की काय, अशी भीती होती. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २,८३,६२२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात २,७९,५४१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली.