मनपा प्रशासनाने प्रत्येक घर, दुकाने, बाजारपेठ, तसेच हाॅटेलमधून कचरा जमा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. सर्व्हिस लाइन, तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा जमा करण्यासाठी ट्रॅक्टरची सुविधा आहे. अशा स्थितीत माेठे नाले, गटारांमध्ये कचरा साचत असण्यावर नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला एप्रिल महिन्यात सुरुवात करणे अपेक्षित असताना बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक निविदा प्रक्रियेला विलंब केला जाताे. यंदा बांधकाम विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत नालेसफाईसाठी तब्बल ७५ लाख रुपयांची तरतूद केली. प्रत्यक्षात नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाल्याचा गवगवा केला जात असला, तरी मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळे नालेसफाईची पाेलखाेल झाल्याचे सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सभेत सांगितले. सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने रात्री त्यांची एकच तारांबळ उडाल्याचे मिश्रा यांनी सांगितले. दरवर्षी ही समस्या पावसाळ्यात निर्माण हाेत असल्याची जाणीव असतानाही सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी व प्रशासन बेफिकीर राहिल्याची टीका मिश्रा यांनी केली.
सत्ताधाऱ्यांचे प्रशासनाकडे बाेट
नालेसफाईच्या मुद्द्यावर सेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादीने टीकेची झाेड उठवताच, सत्तापक्षाने प्रशासनाकडे बाेट दाखविले. भाजपचे स्वीकृत नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांनी नालेसफाईच्या संदर्भात मुंबई महापालिकेच्या कार्यप्रणालीवर आराेप करताच, राजेश मिश्रा यांनी शहरातील नालेसफाईवर भाजप अपयशी ठरल्याचे प्रत्युत्तर दिले.
प्रभाग ३ मधील नाल्यांची सफाई करा!
प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडियानगर, खरप, पाचपिंपळ आदी परिसरांतील माेठ्या नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे बुधवारी सकाळी रहिवाशांची रहदारी बंद झाल्याचा मुद्दा भाजपच्या माजी सभागृहनेता गीतांजली शेगाेकार यांनी उपस्थित केला. या समस्येची आयुक्त निमा अराेरा यांनी दखल घेतली.