Maharashtra Election 2019 : आज फैसला; मैदानात कोण राहणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 10:56 AM2019-10-07T10:56:23+5:302019-10-07T10:56:33+5:30
मैदानात कोण कायम राहणार, याचा निर्णय सोमवार, ७ सप्टेंबर रोजी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर जवळपास प्रत्येक मतदारसंघात बंडखोरांनी पक्षाच्या उमेदवारांसह प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारांनाही कोंडीत पकडले आहे. या सर्व बंडोबांना थंडोबा करण्यासाठी विविध कसरती सुरू आहेत. तर कुणाला पक्षशिस्तीचा बडगाही दाखविला जात आहे. दुसरीकडे विविध समाजाच्या बैठका वेगाने सुरू असून, समाजातील दोन उमेदवारांपैकी एकाने माघार घेण्याबाबत दबावही टाकला जात आहे. या पृष्ठभूमीवर मैदानात कोण कायम राहणार, याचा निर्णय सोमवार, ७ सप्टेंबर रोजी होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोणते बंडोबा थंडोबा झाले, हे स्पष्ट होईलच.
अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस नेते मदन भरगड यांनी ‘वंचित’ची उमेदवारी घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहीलच. भाजपाचे सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज वैध ठरला आहे. त्यांना भाजपाने पक्षातून निलंबित केले आहे. भाजपमध्ये ओळंबे हे पालकमंत्री गटाचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उमेदवारी पालकमंत्र्यांच्या निर्देशावरून मागे घेतली जाते का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण गव्हाणकर व भारिपचे गजानन दांदळे यांच्या उमेदवारीबाबत रविवारी समाजाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयावर या दोन्ही उमेदवारांच्या लढतीची तीव्रता ठरणार आहे. अशीच स्थिती बळीराम सिरस्कार व डॉ. संतोष हुशे यांची आहे. अकोला पूर्व या मतदारसंघातून ‘वंचित’चे नेते व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे हे रिंगणात कायम राहिले तर येथे आजी आमदाराला दोन माजी आमदारांचे आव्हान ठरेल. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे बंडखोर राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती संघटनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे ते कायम राहण्याचे संकेत आहेत. ‘वंचित’चे बंडखोर सम्राट डोंगरे, अकोटमधील सेनेचे बंडखोर अनिल गावंडे यांच्याही उमेदवारीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या सर्व बंडोबांना रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न होत आहेत. सोमवारी दुपारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत यामधील काही बंडोबा थंड झाले, तर संभाव्य मत विभाजन टळेल, अन्यथा सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आणखी तीव्र चुरसमध्ये बदलतील.
१४२ उमेदवारी अर्ज वैध
जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये छाननीअंती १०१ उमेदवारांचे १४२ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ७ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या लढतीचे चित्र सोमवारी दुपारनंतर निश्चित होणार आहे.