अकोला: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यासाठी कर्मचारी, अधिकारी संयुक्त संघटना कृती समितीच्यावतीने १४ जूनपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी दुपारी समितीच्यावतीने निर्दशने केली. सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मजीप्रामधील अधिकारी, कर्मचारी १ जूनपासून काळ्या फिती लावून काम करीत होते. परंतु शासनाने वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. त्यामुळे १४ जूनपासून दुसऱ्या टप्प्यात दुपारी घोषणाबाजी करीत, निर्दशने करण्यात आली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनात काम करावे लागत असून, अनेक आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने सकारात्मक पाऊले उचलले नाहीत तर कृति समितीच्यावतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात गजानन गटलवार, टी.जी. पिंजन, अभिमन्यू डोळसे, दीपक धोटे, बाळासाहेब वसू, शिवाजी हरेर, निशिकांत ठोंबरे, विश्वास वानखेडे, राजाराम विठाळकर, सुधीर चौधरी, अजय मालोकार, अशोक अळवनी, बाळकृष्ण यमगर, अनिल इंगोले यांच्यासह मजीप्रातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.