अकोला : कौलखेड चौकातील शिवशक्ती प्रतिष्ठानद्वारा संचालित वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी सायंकाळी १०१ नवदाम्पत्यांच्या हस्ते महाआरतीला सुरुवात करण्यात आली. कौलखेडसह शहरातील १०१ जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची आरती १०१ जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली. या आरतीच्यावेळी साम्राज्य ढोल-ताशांचे १०० मुला-मुलींचे पथक यांनी ढोल-ताशांच्या गजरात महाआरतीला साथ दिली. साम्राज्य ढोल-ताशांच्या गजराने सर्व परिसर दणानून गेला होता. वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाच्या पदधिकाऱ्यांनी कौलखेड चौकातील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला हारार्पण करून महाआरतीला सुरुवात केली. दरम्यान, परिसरात आकर्षक रोषणाई करीत आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. गत ३७ वर्षांपासून वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ कौलखेड येथे विविध समाजोपयोगी व समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, यावर्षीही विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीला माजी मंत्री गुलाबराव गावंडे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत पिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, माजी नगरसेवक पंकज गावंडे व परिसरातील महिला, युवक, युवती तसेच ज्येष्ठ नागरिक आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.