एमआयडीसी भूखंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:18 PM2020-02-26T12:18:38+5:302020-02-26T12:18:38+5:30
अविनाश रूपराव चंदन (रा. सुधीर कॉलनी, अकोला) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
अकोला : औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रीय अधिकारी दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांनी संगनमत करून भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करीत खोट्या व बनावट नोंदी करून कोट्ट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदेशीर वाटप करून घोटाळा करणारे मुख्य सूत्रधार एमआयडीसीचा कार्यकारी अभियंता अविनाश रूपराव चंदन (रा. सुधीर कॉलनी, अकोला) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. न्यायालयाने त्याला १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
भूखंड घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंता अविनाश चंदन आणि अमरावती एमआयडीसीचा व्यवस्थापक पुरुषोत्तम मारुतराव पेटकर (रा. नागपूर) यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला होता. २0 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने दोघांचाही अर्ज फेटाळून लावला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही अधिकारी फरार होते. एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी कार्यकारी अभियंता अविनाश चंदन याला अटक केली. (प्रतिनिधी)