मोठ्या कंपन्या, उद्योजकांनी फिरविली अकोल्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:49 PM2019-04-07T13:49:45+5:302019-04-07T13:49:55+5:30

अकोला : अपुरी जागा, कायमस्वरूपी पाण्याचा अभाव आणि तब्बल ११ वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा रेंगाळत असल्याने मोठ्या कंपन्यांसह उद्योजकांनी अकोला एमआयडीसीकडे पाठ फिरविली आहे.

Major companies, entrepreneurs turn their back toward Akola | मोठ्या कंपन्या, उद्योजकांनी फिरविली अकोल्याकडे पाठ

मोठ्या कंपन्या, उद्योजकांनी फिरविली अकोल्याकडे पाठ

Next

- संजय खांडेकर
अकोला : अपुरी जागा, कायमस्वरूपी पाण्याचा अभाव आणि तब्बल ११ वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा रेंगाळत असल्याने मोठ्या कंपन्यांसह उद्योजकांनी अकोलाएमआयडीसीकडे पाठ फिरविली आहे. पाच वर्षांत अकोल्यात नवीन उद्योग तर आलेच नाही. उलटपक्षी आहे त्यातील तेल, ढेप आणि दाल मिलचे अनेक उद्योग बंद पडले आहे.
तूर, कापसाचा पेरा जास्त असल्याने त्याच्यासंबंधी व प्रक्रिया करणारे उद्योग जास्त होते. ज्यामध्ये टेक्सटाइल्स मिल, सूतगिरणी, आॅइलमिल्स, सोबतच ढेप मिल्स, साबण उद्योग, तूर डाळ, बेसन आदी उद्योग यांचा समावेश होता; मात्र पीक, औद्योगिक परिस्थिती बदलत गेल्याने अनेक उद्योगांवर अवकळा आली. पाच वर्षांत अनेक उद्योग गुंडाळले गेले. बोटांवर मोजण्याऐवढे मोठे उद्योग सोडले तर लहान-सहान उद्योग अकोल्यात सुरू आहे. एमआयडीसीत ६०० उद्योग कागदोपत्री असले तरी वास्तविकतेत मात्र लहान-मोठे ४०० उद्योगच सुरू आहे. इतर उद्योगांच्या ठिकाणी गोदाम उभारले गेले आहे. मोठ्या उद्योगांच्या तुलनेत लहान उद्योगांची संख्याच जास्त आहे.

 एनटीसी, बिर्ला आॅइल मिल्स, सीमप्लेक्सची उणीव अजूनही

कधीकाळी अकोल्यात नॅशनल टेक्सटाइल्स पार्कच्या दोन नामी मिल्स अकोल्यात होत्या. अकोलेकरांची पहाट सावतराम आणि मोहता मिल्सच्या व्हिसलने होत असे. हे दोन्ही मिल्स बंद पडले. त्यापाठोपाठ बिर्ला आॅइल मिल्स आणि सीमप्लेक्स मिल्सनेही आपले बिºहाड गुंडाळले. गेल्या काही वर्षांत हे मोठे उद्योग गुंडाळल्या गेल्याने हजारो अकोलेकरांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. नवीन उद्योग येतील, अशी अपेक्षा अकोलेकरांना होती ती अद्याप पूर्ण झालेली नाही.

 उद्योगांपेक्षा गोदामांचीच संख्या अधिक
एमआयडीसीतील मंजूर झालेले प्लॉट आपल्या हातून जाऊ नये म्हणून नाममात्र उद्योग उघडून ठेवत आहेत.
काहींनी तर उद्योगाऐवजी गोदाम बांधून भाड्याने दिल्याचे चित्र अकोला एमआयडीसीत दिसत आहे. त्यामुळे अकोला एमआयडीसीत उद्योगांपेक्षा जास्त गोदामांची संख्या अधिक झाली आहे.

 केमिकल्स, लेदर इंडस्ट्रीजसाठी पोषक वातावरण

अकोला परिसरातील हवामान उष्ण आणि कोरडे असल्याने केमिकल्स आणि लेदर इंडस्ट्रीजसाठी पोषक आहे; मात्र त्या दिशेने शासनाने कधी पाऊल उचलून मोठ्या उद्योगांना चालना दिली नाही. या वातावरणाचा फायदा शासनाने घेतला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.


 उद्योग उभारण्यात सक्तीची गरज
अनेकजण उद्योग उभारणीच्या नावाखाली स्वस्त दरात प्लॉट विकत घेतात; मात्र उद्योगाऐवजी त्याचा गोदाम किंवा इतर कामांसाठी उपयोग करतात. पाच वर्षे होत आले की पुन्हा उद्योग दाखवितात. अशा संधीसाधूंना हाकलून लावण्यासाठी ५ ऐवजी १ वर्षाच्या उद्योग उभारणीची मर्यादा घालून द्यावी. गुजरातमध्ये हा नियम आहे, राज्यात का नाही?

 प्लाट विक्रीचा गोरखधंदा
अकोला एमआयडीसीत नाममात्र प्लॉट अडकून, ब्लॅकने प्लॉट विकण्याचा धंदा काही स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी चालविलेला आहे. असा गोरखधंदा चालविणाऱ्यांवर कारवाई झाल्यास खºया उद्योजकांना संधी मिळेल.

   
 अकोला एमआयडीसीत अजूनही प्लॉटची मागणी आहे; मात्र जागा नाही. इकॉनॉमिक झोनसाठी ५० हेक्टरचा प्लॉट राखीव ठेवलेला आहे, त्यात भविष्यात टेक्सटाइल पार्क होईल.
- सुधाकर फुके, विभागीय अधिकारी, अमरावती.

 अमरावतीच्या तुलनेत अकोल्यातील एमआयडीसी जास्त महसूल देते; मात्र अकोल्यातील उद्योजकांना कायमस्वरूपी पाणी नाही, जागा नाही. मोठे उद्योग अकोल्यात येण्यासाठी विमानसेवा सुरू केल्या जात नाही. राजकीय इच्छाशक्ती असणारे नेते अकोल्यात दुर्दैवाने नाहीत.
-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, इंडस्ट्रीज असोसिएशन अकोला.
 

 

Web Title: Major companies, entrepreneurs turn their back toward Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.