एसटीतून १८ लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आराेपीला बेड्या

By आशीष गावंडे | Published: February 21, 2024 09:40 PM2024-02-21T21:40:22+5:302024-02-21T21:41:32+5:30

हरियाणातून केली अटक; ‘एसपी’ बच्चन सिंह यांची माहिती

man arrested from haryana for stealing jewelerry worth 18 lakhs from ST bus | एसटीतून १८ लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आराेपीला बेड्या

एसटीतून १८ लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आराेपीला बेड्या

आशिष गावंडे/ अकोला: लग्नासाठी एसटीतून छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेतून सुमारे १६.५० लाखांचे दागिने व राेख दिड लाख रुपये लंपास करणाऱ्या हरियाणातील आराेपीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी एका आराेपीला हरियाणातून बेड्या ठाेकत त्याच्याकडून साेन्याचे सर्व दागिने व राेख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती बुधवारी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अमीत पिता बिजेंद्र (३४)रा. रूरकी ता. जि. रोहतक, हरियाणा असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. उमरी परिसरातील फिर्यादी सतीष बाबुराव गंगाळे (६०)हे १० फेब्रुवारी राेजी त्यांच्या पत्नीसह लग्नकार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याकरीता मध्यवर्ती बस स्थानकातून एसटी बसने निघाले हाेते. यावेळी मदत करण्याच्या बहाण्याने आराेपीने गंगाळे यांच्या हातातील बॅग घेऊन त्यातून साेन्याचे दागिने व राेख रक्कम लंपास केली हाेती. याप्रकरणी सिव्हील लाइन पाेलिस ठाण्यात अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके यांना निर्देश दिले हाेते. शेळके यांनी १३ फेब्रुवारी राेजी पो.उप. नि. गोपाल जाधव, पो.हे.कॉ. खुशाल नेमाडे, पो.कॉ. वसिमोद्दीन, पो.कॉ. मोहम्मद आमीर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे पथक तपासाकरीता रवाना केले. दरम्यान, अवघ्या दहा दिवसात या चाेरीचा छडा लावून आराेपीला अटक केल्याची माहिती ‘एसपी’ बच्चन सिंह यांनी दिली. 

किसान आंदाेलनामुळे रस्ते बंद
‘एलसीबी’ने वाशिम बायपास चाैक परिसर व इतर ठिकाणचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तपासले. तपासाअंती यातील आराेपी हा हरियाणा येथील रोहतक  येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने एक पथक हरियाणा येथे रवाना झाले होते. हा परिसर दिल्ली, हरियाणा, पंजाबचा सिमावर्ती भाग असल्याने व तेथे सुरू असलेल्या किसान आंदोलनामुळे पाेलिसांना बंद रस्त्यांसह मोबाईल नेटवर्कच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. 

साेन्याचे दागिने,रक्कम जप्त
पाेलिसांनी हरियाणा येथील खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर केला. त्यातून अमीत पिता बिजेंद्र हाच आराेपी असल्याचे समाेर येताच त्याला शिताफीने अटक केली. आराेपीकडून २७५ ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत १६ लाख ५० हजार रूपये व नगदी दिड लाख रूपये असा एकुण १८ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: man arrested from haryana for stealing jewelerry worth 18 lakhs from ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.