पातूर पर्यटन केंद्रात अनेक दुर्मीळ पक्ष्यांचा अधिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:43 AM2020-11-09T11:43:24+5:302020-11-09T11:46:13+5:30
Patur tourist center, bird habitats कोतवाल, सोनेरी पाठीचा सुतार, बंटिंग, रेड हेडेड बंटिंग यासारखे अनेक दुर्मीळ पक्षी आढळून आले.
- संतोषकुमार गवई
पातूर : वन विभागांतर्गत सुरू असलेल्या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने रविवारी पातूरच्या पर्यटन केंद्रात पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन केंद्रात ४५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे, तर अनेक दुर्मीळ पक्ष्यांचा अधिवास या भागात असल्याचे निरीक्षणात आढळून आले आहे.
डॉ. सलीम अली आणि मारुती चित्तमपल्ली यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात वन विभागाने पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पातूर वन विभागांतर्गत ५ नोव्हेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार ८ नोव्हेंबर रोजी रविवारी पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षी तज्ज्ञ दीपक जोशी यांनी परिसरातील पक्ष्यांची माहिती दिली. यावेळी निरीक्षणादरम्यान पांढऱ्या पोटाचा कोतवाल, सोनेरी पाठीचा सुतार, बंटिंग, रेड हेडेड बंटिंग यासारखे अनेक दुर्मीळ पक्षी आढळून आले. तर विविध प्रजातीच्या ४५ पक्ष्यांची यावेळी नोंद करण्यात आली. यानंतर समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक उप वनसंरक्षक पडगव्हाणकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षीतज्ज्ञ दीपक जोशी उपस्थित होते. तर वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, सरपंच जयश्री घुगे, पोलीस पाटील रुस्तमराव घुगे, उपसरपंच मधुकर आडे, पर्यटन समिती अध्यक्ष शिवाजीराव घुगे, किड्स पॅराडाइजचे संस्थापक गोपाल गाडगे, डॉ. महाशब्दे, डॉ. अडगावकर, डॉ. मुंदडा, डॉ. भारती, डॉ. मोरे, डॉ. काळे, वनरक्षक अविनाश घुगे आदी मान्यवर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. प्रास्तविक वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. (फोटो)