शिक्षक संख्येचे गणित बिघडले, ९७ अतिरिक्त, २९३ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 10:58 AM2021-07-28T10:58:32+5:302021-07-28T10:58:39+5:30
Education Sector News : मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षक, मुख्याध्यापकांची तब्बल २९३ पदे रिक्त आहेत.
अकोला : अकोला जिल्हा परिषद शाळांमधीलशिक्षक संख्येचे गणित सध्या बिघडलेले दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षक, मुख्याध्यापकांची तब्बल २९३ पदे रिक्त आहेत. ९७ शिक्षक अधिसंख्य पदावर अतिरिक्त ठरले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.
२०१८-२०१९ या वर्षी संच मान्यता झाली होती. त्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन करण्यात आले. परंतु त्यानंतर मात्र, संच मान्यताच झाली नाही. त्यामुळे रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांची संख्या समजू शकलेली नाही. जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर निश्चितच परिणाम होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
जिल्हा परिषद शाळांमध्ये मराठी माध्यमाचे १८७ व उर्दू माध्यमाचे १०६ शिक्षक, मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शाळांमधील कामकाजावर परिणाम होत आहे.
अनेक विषयांच्या शिक्षक, मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, भाषा व विज्ञान विषयाच्या मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे.
रिक्त पदांवर अधिसंख्य पदांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. परंतु हा विषय तांत्रिकदृष्ट्या शासनाच्या अधिन असल्यामुळे ही पदे रिक्तच राहत आहे.
सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ३,३२७ शिक्षक पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३,०३४ शिक्षक कार्यरत आहेत.
रिक्त पदे
मराठी शाळेतील- १८७
उर्दू शाळेतील- १०६
अतिरिक्त शिक्षक- ९७ (अधिसंख्य पदांवर)
कुठल्या विषयाचे किती पदे रिक्त
गणित- ७३
इंग्रजी- ६२
भाषा- ७६
विज्ञान- ८२
संच मान्यता झाली नसल्यामुळे रिक्त, अतिरिक्त पदे स्पष्ट होणार नाही. सहायक अध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर बरेच रिक्त पदे कमी होतील. काही शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे. शाळांमध्ये विषय शिक्षक दिलेले आहेत.
-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक
२०१८-१९ पासून संच मान्यताच झाली नाही. त्यामुळे रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शून्य आहे. शिक्षण विभागात शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची अनेकदा शिक्षक परिषदेने मागणी केली.
-नितीन बंडावार, कोषाध्यक्ष राज्य शिक्षक परिषद
-शशिकांत गायकवाड, जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना