लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मातृ वंदना योजनेंतर्गत जिल्ह्यातील १४ हजार लाभार्थी महिलांची नोंदणी झाली असून, ४ कोटी ९० लाख रुपये लाभ देण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत प्रथम गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा १ जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर झाली असेल व त्यांनी शासनाने अधिकृत केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी करण्यात देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस ५ हजार एवढी रक्कम आधार सलंग्न बँक खात्यात किंवा पोस्ट आॅफिसमधील खात्यात तीन टप्यात दिली जाते. पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर १ हजार रुपये, दुसरा हप्ता किमान एकदा प्रसूतिपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये, तिसरा हप्ता बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मत: एक मात्रा बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस बी तसेच पेन्टाव्हॅलेन्ट चे ३ व ओपीव्ही च्या ३ मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये देण्यात येईल.ही योजना सध्या ग्रामिण क्षेत्राबरोबरच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये लागू आहे. वाशिम जिल्हयात या योजनेअंतर्गत १४ हजार लाभार्थींची नोंदणी झाली असून या मध्ये ४ कोटी ९० लाख रुपये लाभ देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मातृ वंदना योजना : वाशिम जिल्ह्यात १४ हजार महिला लाभार्थींची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 1:37 PM