अकोला : आषाढी एकादशीनिमित्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प अकोला एक अंतर्गत आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी अंगणवाडीतील चिमुकल्यांनी दिंडीच्या माध्यमातून पोषण आहाराचा संदेश दिला. दिंडीमध्ये देशमुख फैल परिसरात नऊ अंगणवाड्यांचा सहभाग होता.देशातील बालकांचे पोषण योग्य रीतीने व्हावे, यानुषंगाने शासनामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी देशमुख फैल परिसरातून पोषण आहार दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये अंगणवाडीतील चिमुकल्यांनी विठू-रुखमाईसह वारकऱ्यांची वेशभूषा धारण करीत पोषण आहाराचा संदेश दिला. या सोहळ्यात तारफैल परिसरातील नऊ अंगणवाड्यांचा सहभाग होता. चिमुकल्यांसोबतच माता, महिला बचत गट व कर्मचाऱ्यांनी दिंडीमध्ये सहभागी होत पोषण आहाराची जनजागृती केली. देशमुख फैल येथून निघालेली ही दिंडी विजय नगर, सिद्धार्थ विद्यालय, व्हीएचबी कॉलनी भागातून काढण्यात आली. हा पोषण दिंडी सोहळा पर्यवेक्षिका सारिका चव्हाण तसेच सर्वच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या परिश्रमाने यशस्वी पार पडला.