अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 05:49 PM2020-03-22T17:49:21+5:302020-03-22T17:49:28+5:30
एका अल्पवयीन मुलीला राष्ट्रीय महामार्गावरील शहराबाहेर असलेल्या मंदिराजवळ नेऊन तिचा विनयभंग केला.
मूर्तिजापूर : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना १३ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर घडली. पीडितेच्या वडिलांनी २१ मार्च रोजी शहर पोलिसांत रात्री उशिरा तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
आरोपी आशिष रवींद्र गवई (२३) रा. ग्रामसेवक कॉलनी सिरसो व रवी राजू वाकोडे (१९) रा. बँक कॉलनी नाका नंबर ७ सिरसो यांनी संगनमत करून एका अल्पवयीन मुलीला राष्ट्रीय महामार्गावरील शहराबाहेर असलेल्या मंदिराजवळ नेऊन तिचा विनयभंग केला. उपरोक्त प्रकार १३ मार्च रोजी घडला. तेव्हापासून सदर मुलगी घरात बेचैन व अस्वस्थ राहत असल्याने घरच्या मंडळींनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता घडलेला सदर प्रकार तिने आई-वडिलांकडे कथन केला. तिच्यासोबत घडलेला गंभीर प्रकार लक्षात घेता पीडितेच्या वडिलांनी २१ मार्च रोजी शहर पोलिसांत रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५४, ३५४ (ड) व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम (पोस्को) अंतर्गत कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी )