विदर्भात १५ जूनपर्यंत मान्सून धडकणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:30 PM2019-06-02T13:30:39+5:302019-06-02T13:33:21+5:30
अकोला: अल-निनोच्या सौम्य प्रभावानंतर मान्सून सक्रिय झाला असून, विदर्भात येत्या १५ जूनपर्यंत धडकणार, असे भाकीत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले.
- राजरत्न सिरसाट
अकोला: अल-निनोच्या सौम्य प्रभावानंतर मान्सून सक्रिय झाला असून, विदर्भात येत्या १५ जूनपर्यंत धडकणार, असे भाकीत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले. यावर्षीच्या मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल तसेच वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात आठ जिल्हे व चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसात खंड पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली.
कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्षा आर्द्रता, वाºयाचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर यावर्षीच्या राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. निकषात वाºयाचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, अकोला, सिंदेवाही, परभणी येथे पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता असून, दापोली, पाडेगाव व नागपूर भागात खंडित वृष्टी राहील.
दरम्यान, पश्चिम विदर्भात ९५ टक्के पावसाचा अंदाज असून, अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेंबर सरासरी ६८३ मिमी सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होईल. मध्य विदर्भात ९८ टक्के पावसाची शक्यता आहे. अशीच स्थिती बुलडाणा जिल्ह्याचीही असेल. नागपूर येथे याच कालावधीत सरासरी ९५८ मिमी सरासरीच्या ९७ टक्के पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ८८२ मिमी सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे सरासरी ११९१ मिमी सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात यावर्षी ९५ टक्के पावसाची शक्यता असून, परभणी जिल्ह्यात सरासरी ८१५ मिमी सरासरीच्या ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. कोकणात ९० टक्के पावसाचा अंदाज आहे. दापोली येथे जून ते सप्टेंबरपर्यंत ३३३९ मिमी सरासरीच्या ९० टक्के पाऊस होईल. उत्तर महाराष्टÑात ९७ टक्के पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सरासरी ४३२ मिमी या सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. धुळे सरासरी ४८१ मिमी ९७ टक्के, जळगाव सरासरी ६३९ मिमी ९६ टक्के पाऊस होईल. पश्चिम महाराष्टÑात ९५ टक्के पावसाचा अंदाज असून, कोल्हापूर सरासरी ७०५ मिमी ९५ टक्के, कराड सरासरी ५७० मिमी ९६ टक्के, पाडेगाव सरासरी ३६० मिमी ९७ टक्के, सोलापूर सरासरी ५४३ मिमी ९० टक्के, राहुरी सरासरी ४०६ मिमी ९५ टक्के, पुणे सरासरी ५६६ मिमी सरासरीच्या ९५ टक्के पावसाची शक्यता आहे.
- राज्यात सरासरी ९५ टक्के पावसाची शक्यता असून, विदर्भात १५ जूनपर्यंत दमदार मान्सूनचे आगमन होईल. निकषानुसार वाºयाचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात काही ठिकाणी पावसात मोठा खंड पडेल.
- डॉ. रामचंद्र साबळे,
ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, पुणे.