गोवर्धन गावंडे
हिवरखेड : अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेले वारी हनुमानगढ हे एक निसर्गाच्या कुशीत वसलेले प्रेक्षणीय स्थळ. निसर्गरम्य ठिकाण असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. मात्र, अतिउत्साहाच्या भरात अनेकांनी या ठिकाणी जीवसुद्धा गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. गत पाच वर्षांमध्ये आतापर्यंत १५० हून अधिक व्यक्तींचा मामा-भाच्याच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटताना काळजी घेणे गरजेचे आहे.
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेडपासून काही अंतरावर वारी हनुमानगढ प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र आहे. जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरातून या ठिकाणी भाविक तथा पर्यटक येतात. त्यामुळे येथे बारा महिनेही मोठ्या प्रमाणत गर्दी असते. चोहीकडे असलेल्या टेकड्या, हनुमानसागर प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करतात, तसेच सातपुडा पर्वतरांगेत समर्थ रामदास स्वामींनी येथील हनुमान मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी रामदास स्वामींचे छोटे मंदिर आहे. येथील देवस्थानावर भाविकांचा विश्वास असल्याने हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव होऊ शकला नाही. सद्य:स्थितीत जिल्हा प्रशासनाने नियमांचे पालन करून हनुमान दर्शन व पर्यटन पूर्वरत सुरू केले आहे. त्यामुळे पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटायचा असल्यास स्वत:चा जीव सांभाळणे गरजेचे आहे.
-------------------
मामा-भाच्याचा डोह धोकादायक
हनुमान मंदिर परिसरात काही डोह आहेत जे बारमाही पाण्याने भरलेले राहतात. वारी हनुमान येथे गेल्यानंतर अनेकांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता येत नाही. येथे मामा-भाच्याचा नावाने एक डोह आहे. या डोहात गेल्या पाच वर्षांत दीडशेहून अधिक व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला आहे. या डोहात कपारी असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात.