सोयाबीनवर पाचपेक्षा अधिक किडींचे आक्रमण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:11 PM2019-08-31T13:11:40+5:302019-08-31T13:11:44+5:30
या किडींचे व्यवस्थापन करताना शेतमजूर, शेतकऱ्यांना विषबाधांचे प्रकार वाढले आहेत.
अकोला : हवामानात सारखा होत असलेला बदल, पावसाची कमतरता हे प्रतिकूल वातावरण किडींना पोषक ठरत असून, सोयाबीनसह इतर सर्वच पिकांवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीनवर तर पाच ते सहा अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडींचे व्यवस्थापन करताना शेतमजूर, शेतकऱ्यांना विषबाधांचे प्रकार वाढले आहेत. तसेच शेतकºयांचा कीटकनाशकांच्या नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढला आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात अनियमितता सुरू असून, २३ जून रोजी आल्यांनतर थेट २५ जुलै रोजी पाऊस बरसला. त्यानंतर तुरळक स्वरू पाचा पाऊस अधून-मधून सुरू आहे. मध्येच कमाल तापमान वाढत असून, उन्हाचे चटके, दमट वातावरण तयार होत आहे. हेच वातावरण किडींना पोषक ठरत असल्याने यावर्षी सुरुवातीपासूनच शेतकºयांना कीड व्यवस्थापनावर खर्च करावा लागत आहे. सोयाबीन पिकावर सध्या काळ्या रंगाच्या अळीसह हिरवी उंटवर्गीय अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, चक्रभुंगा आदी अळ्या, किडींनी आक्रमण केले आहे.
कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून, ज्यांनी रेफ्युजीची पेरणी केली, तिथे हे प्रमाण सध्या कमी आहे; परंतु ज्या ठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत, तेथे बोंडअळी वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व कपाशीवर यावर्षीही बोंडअळीने बस्तान मांडल्याने त्या शेतकºयांना चांगलीच दक्षता घ्यावी लागत आहे. हीच अळी नियमित खरीप कपाशीवर येण्याचे प्रकार मागच्या काही वर्षांत घडले. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात ही अळी या कपाशीवर दिसून येते, तेव्हा शेतकºयांना दक्षता घेण्याची गरज आहे.
सोयाबीन पिकावर चार ते पाच अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या तुलनेत कपाशीवर बोंडअळीचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी या दोन्ही मुख्य पिकांवरील कीड, अळ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांनी शेताचे नियमित सर्वेक्षण करू न कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशके फवारणी करावी.
- डॉ. अनिल कोल्हे,
मुख्य पीक संरक्षण अधिकारी,
कीटकशास्त्र विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.