अकोला: एका मालकीच्या जागेवर एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देऊ नये, असा महावितरणचा नियम असला, तरी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा नियम धाब्यावर बसविल्या जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या ‘मिलीभगत’ने अनेक वीज ग्राहकांनी वीज वापराच्या कमी दराच्या ‘युनिट स्लॅब’चा फायदा मिळावा या हेतूने एकाच जागेवर एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या घेतल्या असल्याचे वास्तव आहे. महावितरणकडून वीज ग्राहकांना विविध प्रकारच्या वीज जोडण्या दिल्या जातात. यामध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी अशा विविध जोडण्यांचा समावेश आहे. महावितरणच्या नियमानुसार एका मालकीच्या जागेत एकापेक्षा अधिक घरगुती वीजजोडणी देता येत नाही. अर्थात एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक घरगुती वीज मीटर घेता येत नाही. वाणिज्यिक जोडण्या मात्र कितीही घेता येतात. एकाच घरात एकापेक्षा अधिक वीज जोडण्या घ्यायच्या असतील, तर त्यासाठी घराची विभागणी झालेली असणे गरजेचे आहे. घरातील विजेच्या उपकरणांचा वाढता भार वितरित करून वीज देयकाच्या ‘स्लॅब’चा लाभ घेता यावा, यासाठी काही चाणाक्ष वीज ग्राहकांनी एकाच घरात एकापेक्षा अधिक वीज जोडण्या घेतल्याचे वास्तव आहे. वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर ‘स्पॉट व्हेरिफिकेशन’ करण्यासाठी येणाऱ्या महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांशी आर्थिक देवाण-घेवाणीतून अनेक वीज ग्राहकांनी एकापेक्षा अधिक वीज जोडण्या घेतलेल्या आहेत. या प्रकारामुळे महावितरणलाच महसुली फटका बसत आहे; परंतु या प्रकाराकडे फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. वीज वापर विभाजित झाल्याने महावितरणचे नुकसानशंभरपेक्षा अधिक युनिट वापर झाल्यास ग्राहकाला जास्त दराने वीज बिल येते; परंतु एका घरात एकापेक्षा अधिक विद्युत मीटर असल्यास त्या घरातील वीज वापर विभाजित होतो. दोनशे युनिटचा वापर झाल्यास, संबंधित ग्राहकाला दोन मीटरप्रमाणे शंभर युनिट स्लॅबचाच दर लागू होतो. परिणामी महावितरणला आर्थिक नुकसान सहन करावे लागते.महावितरणच्या कर्मचाऱ्यांची साथवीज जोडणी घेण्यासाठी अर्ज केलेल्या ग्राहकाच्या घराचे ‘स्पॉट व्हेरिफिकेशन’ महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून केले जाते. सदर ग्राहकाच्या घरात वीज संचमांडणी व्यवस्थित आहे की नाही, भार मंजूर करून घेतला आहे का किंवा संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा यापूर्वी वीज देयक न भरल्यामुळे कायमस्वरूपी खंडित (पीडी) झालेला आहे का, आदी बाबींची पाहणी तांत्रिक कर्मचारी करतो. या बाबींची पूर्तता नसेल, तर अर्ज खारीज केल्या जातो; परंतु काही कर्मचारी आर्थिक देवाण-घेवाण करून संबंधित ग्राहकास वीज जोडणी मिळवून देत असल्याचे चित्र आहे.
एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या!
By admin | Published: April 08, 2017 1:18 AM