अकोला : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने सुरु असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सर्वांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठया प्रमाणात बाहेर काढण्यात आली असून नदी पात्र कचऱ्यातून मुक्त होत आहे. मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहिम सुरुच राहणार आहे. नदीच्या स्वच्छतेसाठी शनिवार ३१ मार्चला सकाळी ८ वाजता नदी काठच्या गीतानगर जवळील नदी काठावर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.मोर्णा नदी पूर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प अनेक जणांनी केल्यामुळे ही मोहिम आता मोठी चळवळ बनली आहे. उदयाच्या मोहिमेत मुंबईवरुन अभुदय संघटनेच्या महिला पदाधिकारी स्वच्छतेकरिता येत आहेत. माजी सैनिक संघटनचे सर्व माजी सैनिक जिल्हा सैनिक अधिकारी खंडारे यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेत सहभागी होणार आहेत. तसेच हनुमान जयंती शोभा यात्रा समितीचे सदस्य अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होणार आहेत. बाळापुर उपविभागातील सर्व महसुल कर्मचारी, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील हे पातुरचे तहसीलदार रामेश्वर पुरी व तहसिलदार दिपक पुंडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहेत. आरपीआयचे त्र्यंबक सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त नियमितपणे येणाº्या संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात सहभागी होणार आहेत.नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा व मनपा प्रशासनाने केले आहे. या मोहिमेसाठी सर्वांनी सहकायार्ची भूमिका ठेवावी. कोणालाही दुखापत होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. कोणालाही प्रत्यक्ष नदीच्या आत जाऊन स्वच्छता करावी लागणार नाही, त्यासाठी अनुभवी कामगारांचे साहय घेतले जाणार आहे. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने व शांततेने स्वच्छता करावी. स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.