अकोला: विदर्भात मान्सूनने प्रवेश केला असला तरी बहुतांश भागात अद्याप पोहोचला नसल्याने शेतकऱ्यांना सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. मागील २४ तासात सोमवार, २४ जून सकाळी ८.३० वाजतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान, २५ व २६ जून रोजी विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.रविवार २३ जून रोजी मान्सूनने विदर्भात प्रवेश केला. तथापि, पूर्ण विदर्भात पोहोचला नसला नसल्याचे चित्र आहे. रविवारी पडलेल्या पावसाची अकोल्यात २८.२९ मि.मी. नोंद करण्यात आली. अमरावती येथे २२.८ पाऊस पडला. नागपूर ११ मि.मी., चंद्रपूर १.२ मि.मी., वर्धा २ मि.मी. पाऊस पडला, तर यवतमाळ व गोंदिया येथे शून्य पावसाची नोंद करण्यात आली. तालुकानिहाय चित्र बघितल्यास बुलडाणा, रामटेक, सोनर, तुमसर येथे प्रत्येकी ५ से.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, सेलू, शेगाव येथे ४ सें.मी. पाऊस पडला. तसेच अकोला, चांदूर, जोईली, नांदुरा, परतवाडा, संग्रामपूर, तेल्हारा व तिरोडा येथे ३ सेमी., अमरावती, गोरेगाव, हिंगणा, जळगाव जामोद, कळमेश्वर, कामती, कोमती, कोपर्र्णा, मौदा, नांदगाव काझी, उमरखेड येथे २ सेंमी, अकोट, अंजनगाव, आर्णी, बाळापूर, बार्शीटाकळी, विभापूर, चांदूर बाजार, चिखलदरा, दारव्हा, दारापूर, देओळी, धामणगाव धरण, घाटंजी, कुही, मलकापूर, मारेगाव, मोहाडी, मोर्शी, मूर्तिजापूर, नागपूर, नारखेड, वणी, झारी जामनी येथे १ से.मी. पाऊस पडला.