शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमपीएचएन’ नवा अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:01 PM2019-06-02T13:01:39+5:302019-06-02T13:02:49+5:30
अकोला: एमबीबीएस, पीजी अभ्यासक्रमानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’(एमपीएचएन) हा नवा अभ्यासक्रम सुरू झाला आहे.
अकोला: एमबीबीएस, पीजी अभ्यासक्रमानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’(एमपीएचएन) हा नवा अभ्यासक्रम सुरू झाला आहे; मात्र या अभ्यासक्रमाला केवळ वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकणार आहेत.
मेडिकल हब सोबतच शैक्षणिक हबकडे शहराची वाटचाल सुरू आहे. विशेष करून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होत आहेत. यातच मास्टर्स इन पब्लिक हेल्थ अभ्यासक्रमाच्या साखळीत न्युट्रीशन या नवीन अभ्यासक्रमाचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक सत्रापासून सुरू होत आहे. यापूर्वी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली होती. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीसाठी इतरत्र जाण्याची गरज नाही. याचप्रमाणे एमपीएचएन म्हणजेच ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्यांसाठी शिक्षणाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
अभ्यासक्रमाचा कालावधी - २ वर्ष
एकूण जागा - २०
पात्रता - वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती प्रवेशासाठी पात्र
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’ हा अभ्यासक्रम पहिल्यांदाच सुरू होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती प्रवेशासाठी पात्र ठरणार आहे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला