अकोला - थकबाकीदार ग्राहकांकडे वीज बील वसुली आणि विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी अकोला href='http://www.lokmat.com/topics/court/'>न्यायालयाने आरोपीला सहा महिने सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अकोला येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. डी. सैंदाणी यांच्या न्यायालयाने 19 सप्टेंबर रोजी बुधवारी हा निकाल दिला.
अकोला जिल्ह्यातील महावितरणच्या कुरणखेड शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता कपिल हिरामण वाकोडे, कर्मचारी पी.डी. वानखडे व आर.जी. गुल्हाणे हे थकित वीज बिल वसुलीकरीता 18 सप्टेंबर 2016 रोजी दाळंबी गावात आले होते. तसेच थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याच्या कारवाईसाठी ते आग्रही होते. यावेळी वीज बिलाची थकबाकी असलेले गावातील जालंदर पुंजाजी वानखडे, प्रमिला जालंदर वानखडे व अनिता गजानन कांबळे यांनी वीज पुरवठा खंडीत करण्यास मनाई करीत सहाय्यक अभियंता वाकोडे व सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता कपिल वाकोडे यांच्या तक्रारीवरून जालंदर पुंजाजी वानखडे, अनिता गजानन कांबळे व प्रमिला जालंदर वानखडे यांच्याविरुद्ध बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात भांदवी कलम 353, 332, 294, 506, 34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर घटनेचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात पाच साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपी जालंदर पुंजाजी वानखडे याला कलम 332, 353 नुसार सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी अभियोक्ता विजय पांचोली यांनी युक्तीवाद केला.