अकोला : शहरातील दोन ठिकाणी सौर उर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी निरीक्षण करून त्याचा अहवाल अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तसेच त्यापैकी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. प्रदीप रूपराव पुनसे (५३) असे लाचखोर कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.शहरातील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय तक्रारकर्त्यांने दोन ठिकाणी सौर उर्जेचे प्रकल्प उभारण्याचे कामकाज हाती घेतले होते. या दोन्ही प्रकल्पाचे निरीक्षण करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता प्रदीप पुनसे याच्याकडे होती. त्याने या प्रकल्पाचे निरीक्षण करणे तसेच त्यानंतर सकारात्मक अहवाल असलेली फाइल अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच देण्यास सहमती दर्शविली; परंतु तत्पूर्वीच या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीनंतर अकोला एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. या दरम्यान गोरक्षण रोडवरील महावितरण कार्यालय चाचणी विभागात पंचासमक्ष पुन्हा पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे समोर आले. त्यानंतर गुरुवारी लाच देण्याचे ठरल्यानंतर गोरक्षण रोडवरील कार्यालयात लाचखोर अभियंत्यास १२ हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली. आरोपी प्रदीप पुनसे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची हॅश व्हॅल्यू तपासण्यात आली आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप-अधीक्षक तपासी अधिकारी एस.एस. मेमान, अनवर खान, संतोष दहीहांडे, अभय बाविस्कर, इमरान यांनी केली. आरोपीला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.