विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी महापालिकेकडे पैसेच नाहीत!
By Admin | Published: August 4, 2016 01:41 AM2016-08-04T01:41:52+5:302016-08-04T01:41:52+5:30
तिजोरीत ठणठणाट: निधीची फाइल वित्त विभागाकडे पडून.
आशिष गावंडे
अकोला, दि.३- शिक्षण विभागाच्या लेटलतिफ कारभारामुळे महापालिक ा शाळेतील चिमुकल्या दोन हजार विद्यार्थ्यांना येत्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (१५ ऑगस्ट) देखील गणवेश उपलब्ध होण्याची आशा धुसर झाली आहे. मनपाच्या तिजोरीत ठणठणाट असल्यामुळे मंजूर निधीची फाइल वित्त विभागाकडे पडून असल्याची माहिती समोर आली आहे.
शाळेचा पहिला दिवस अन् त्यात नवीन शालेय गणवेश असेल, तर चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. या उत्साहाला नख लावण्याचे काम मागील काही वर्षांंपासून सातत्याने महापालिकेचा शिक्षण विभाग करीत असल्याचे लक्षात येते. सर्व शिक्षा अभियानच्यावतीने दरवर्षी अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४00 रुपयांमध्ये प्रत्येकी दोन गणवेश मोफत उपलब्ध करून दिले जातात. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांंसाठी मात्र अशी कोणतीही तरतूद नाही.
कोवळ्य़ा वयातील मुलांची मानसिकता लक्षात घेता, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांंनादेखील शाळा सुरू होताच शालेय गणवेश देणे गरजेचे आहे. अर्थातच त्यासाठी शिक्षण विभागाने एप्रिल किंवा मे महिन्यात आर्थिक निधीची तरतूद करणे अपेक्षित असताना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांंच्या मुद्यावर हा विभाग जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.