शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर नागरिकांसाठी तात्पुरता निवारा उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, जुने बसस्थानक परिसर, रेल्वे स्थानक परिसर तसेच मुख्य रस्त्यालगत जागा दिसेल त्याठिकाणी बेघर नागरिकांनी ठाण मांडल्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेच्या ‘एनयुएलएम’ विभागाच्यावतीने अशा बेघर नागरिकांचा शाेध घेऊन त्यांना बेघर निवाऱ्यात मुक्कामासाठी पाठवले. अकाेटफैल पाेलीस ठाण्यासमाेर मनपाच्या हिंदी मुलांची शाळा क्रमांक ३च्या परिसरात बेघरांचा निवारा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी मूलभूत साेयी सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकंत्री ना. बच्चू कडू यांनी भेट दिली असता सुविधांची पूर्तता नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले हाेते. इमारतीची डागडुजी करून स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून इतर साेयी सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले हाेते. दरम्यान, येत्या २६ जानेवारी राेजी पालकमंत्री बेघर निवाऱ्याची पाहणी करतील, या विचारातून मनपा प्रशासनाने निवाऱ्याच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.
गतीमंद व्यक्ती पळून जातात!
शहरातील प्रमुख रस्त्यालगत काही गतीमंद महिला तसेच पुरूष आढळून येतात. अशा व्यक्तिंना मनपाने बेघर निवाऱ्यात मुक्कामासाठी हलविले असता एक दाेन दिवसांत अशा व्यक्ती पळून जात असल्याची समस्या निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर ठाण
मागील काही दिवसांपासून मनपाने बेघर नागरिकांना शाेधण्याची माेहीम बंद केल्याचे परिणाम दिसून येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य रस्त्यालगत बेघर व्यक्तींनी ठाण मांडल्याचे दिसत आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची आवारभिंत, सिव्हील लाइन पाेलीस ठाण्याची आवारभिंत आदी ठिकाणचा समावेश आहे. मनपाने अशा नागरिकांना बेघर निवाऱ्यात स्थानांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.